खेड:-पोलीस असल्याची बतावणी करत घरात अनधिकृतपणे प्रवेश करून घरातील रिकाम्या कॅनमध्ये 8 लिटर गावठी हातभट्टीची दारू ओतून अवैध दारू व्यवसायाची कारवाई करण्याची धमकी देत 10 हजार उकळल्याची घटना तालुक्यातील बोरघर-ब्राह्मणवाडी येथे घडली.
येथील अविनाश नारायण चव्हाण यांच्याकडे 25 हजारांची मागणी केली. 25 हजारांपैकी 10 हजार रूपये उकळले. याप्रकरणी चौघांवर खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अब्दुल्ला हुसेन नाडकर (डाकबंगला-खेड), फाईक कावलेकर (बोरघर-खेड), सलीम उमर चौगुले (महाडनाका-खेड) यांच्यासह इनोव्हा चालकाचा समावेश आहे. 16 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास चौघांनी चव्हाण यांच्या घरात अनधिकृतपणे प्रवेश केला. पोलीस असल्याची बतावणी करत त्यांना घाबरवत घरी झडतीही घेतली. फिर्यादीच्या घरातील रिकाम्या कॅनमध्ये त्यांच्याकडील 8 लिटर गावठी हातभट्टीची दारू टाकून अवैध दारू व्यवसायाची कारवाई करण्याची धमकीही दिली.
ही कारवाई मिटवण्यासाठी 25 हजार रुपयांची मागणी करत त्यांच्याकडून 10 हजार रूपये उकळले. उर्वरित रक्कम अब्दुल्ला नाडकर यांच्या शहरातील कार्यालयात जमा करण्याबाबत धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. यानुसार चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.