राजापूर:-विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर आता राजापूर विधानसभा मतदार संघात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. इच्छुक उमेदवारांकडून मतदार संघात मोर्चेबांधणी सुरू असतानाच विद्यमान आमदार राजन साळवी यांनी मात्र येत्या गुरूवार 24 ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची घोषणा केली आहे.
20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार असून 22 ते 29 ऑक्टोबर अशी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदार संघातील विद्यमान आमदार राजन साळवी हे गुरूवार 24 ऑक्टोबर रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. गुरूवारी सकाळी 10 वाजता शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे छोटेखानी सभा पार पडणार असून त्यानंतर वाजत-गाजत जोरदार शक्तीप्रदर्शन करत आमदार साळवी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेकडून (उध्दव बाळासाहेब ठाकरे गट) विद्यमान आमदारांना रिंगणात उतरवण्याबाबत निर्णय झाल्याची माहिती समोर आली आहे. आमदार राजन साळवी हे राजापूर विधानसभा मतदार संघातील विद्यमान आमदार असून त्यांनाच पुन्हा संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. या बाबत पक्षाकडून अधिकृत घोषणा झालेली नाही. साळवी गुरूवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याने त्यांच्यासमोर कोणा-कोणाचे आव्हान असणार, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.