रत्नागिरी:-शहरातील मारुती मंदिर-मजगाव बसस्टॉपजवळ तोल जावून पडल्याने प्रौढ जखमी झाला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी 5.30 च्या सुमारास घडली. मंगेश यशवंत भारती (52, रा. तोणदे रत्नागिरी) असे या प्रौढाचे नाव आहे. त्याला रिक्षा चालक व विद्यार्थ्यांच्या मदतीने जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
18 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5.30 वा. सुमारास मजगाव बसस्टॉपजवळ गर्दी दिसून आल्याने रिक्षाचालक लियाकत युसूफ हपशी (रा. साखरतर, रत्नागिरी) याने त्या ठिकाणी पाहिले असता त्याला एक प्रौढ डोक्याला मार लागून जखमी झालेल्या अवस्थेत दिसला. बाजूला असलेल्या विद्यार्थ्यांच्या मदतीने त्याने त्या जखमी प्रौढाला उचलून आपल्या रिक्षातून (एमएच- 08-एक्यु-3425) जिल्हा रुग्णालयात दाखल केले, अशी नोंद पोलिसात करण्यात आली आहे.