24 तास उलटूनही वैद्यकीय अधिकारी न फिरकल्याने नातेवाईकांचा संताप
खेड:-मुंबई-गोवा महामार्गावरील कळंबणी उपजिल्हा रूग्णालयात प्रसुतीसाठी दाखल करण्यात आलेल्या 41 वर्षीय महिलेच्या शस्त्रक्रियेसाठी 24 तास उलटूनही वैद्यकीय अधिकारी न फिरकल्याने गर्भातच बाळ दगावल्याचा संतापजनक प्रकार गुरूवारी रात्री उघडकीस आला. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे बाळ दगावल्याचा नातेवाईकांनी आरोप करत वैद्यकीय अधिकारी व नातेवाईक यांच्यात झालेल्या शाब्दीक बाचाबाचीनंतर वातावरण चिघळले. अखेर पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले.
एका गावातील 41 वर्षीय महिलेस प्रसुतीसाठी कळंबणी उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. 24 तास लोटूनही वैद्यकीय अधिकारी रूग्णालयात आले नाहीत, असे त्यांच्या नातेवाईकंचे म्हणणे आहे. गर्भवती महिलेस प्रचंड त्रास जाणवू लागल्यानंतर नातेवाईकांनी परिचारीकेकडे विचारणा केली असता थोड्याच वेळात वैद्यकीय अधिकारी येतील, असे सांगण्यात आले. मात्र गुरूवारी सायंकाळी उशिरापर्यंत वैद्यकीय अधिकारी रूग्णालयात आले नाहीत. या बाबत पुन्हा विचारणा केल्यानंतर वैद्यकीय अधिकारी वाकवली येथून दापोली येथे शस्त्रक्रियेसाठी माघारी परतल्याचे सांगण्यात आले. यानंतर संतप्त नातेवाईकांनी थेट वैद्यकीय अधिकाऱ्याना मोबाईलवर संपर्क साधला असता कॉल कट केल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. 24 तास उलटूनही वैद्यकीय अधिकारी न फिरकल्याने अखेर महिलेच्या गर्भातच बाळ दगावताच नातेवाईकांनी रूग्णालयात गोंधळ घातला. एका खासगी रूग्णालयात शस्त्रक्रिया करून महिलेच्या गर्भातून मृत अर्भकास बाहेर काढण्यात आले. या प्रकारानंतर वैद्यकीय अधिकारी व नातेवाईक यांच्यात शाब्दीक बाचाबाची झाल्याने वातावरण तंग झाले. सरतेशेवटी पोलिसांना पाचारण करण्यात आले.