चिपळूण:-मध्यवर्ती बसस्थानकातून सुटणारी चिपळूण-मुसाड एसटी पुन्हा चिपळूणच्या दिशेने येत असताना पाली येथे आली असताना तेथील उतारात रस्त्यांवरील खड्डयामुळे चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने बस गटारात कलंडल्याची घटना शुक्रवारी सकाळी 10 च्या सुमारास घडली. या बसमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांसह एकूण 85 प्रवासी होते. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. मात्र यामुळे या रस्त्यावरील खड्डयाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
चिपळूण आगारातून सकाळी 8 वाजता सुटणारी मुसाड बस खांदाट, पालीमार्गे मुसाड या गावी जाते. तसेच पुन्हा सकाळी 10 वाजता मुसाडहून चिपळूणच्या दिशेने येते. शुक्रवारी चिपळूणच्या दिशेने निघालेली बस पाली येथे उतारात आली असता रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळेएसटी चालकाचा बसवरील ताबा सुटला. अशातच ही बस रस्त्यागतच्या गटारामध्ये कलंडली. या बसमध्ये शाळा, कॉलेजसह इतर असे जवळपास 85 प्रवासी होते. कलंडलेली बस गटारामध्ये थांबल्याने पुढील अनुचित प्रकार टळला. अन्यथा 6 फूट खोल खाली येऊन ही बस पुढे अजय महाडिक यांच्या घराला धडकली असती. यातूनच मोठी दुदैवी घटनाही घडली असती.