राजापूर:-दिनांक १८/०५/२०२४ रोजी दुपारी १५.१५ वा ते १५.३० वाजण्याच्या सुमारास मौजे ओणी, राजापूर येथील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या उतारावर दोन तरुण व एका अल्पवयीन मुलाने त्यांचे ताब्यात असणाऱ्या चोरीच्या होंडा युनिकॉर्न या मोटारसायकल वरून येऊन एका अॅक्टिव्हा गाडी चालकाला मधेच अडवून त्याच्या गळयातील सोन्याची चैन व हातातील सोन्याची अंगठी बळजबरीने हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला व पाठीमागून येणाऱ्या फिर्यादी यांची मोटारसायकल अडवून त्यांच्यावर हुबेहूब पिस्टल सारखा दिसणारा लायटर रोखून व धाक दाखवून फिर्यादी यांचे हातातील मोबाईल हिसकावून घेण्यात आला व पैशाची मागणी करून लुटण्याचा प्रयत्न केला गेला. या घटनेनंतर हे तिघेही पाचल मार्गे अणूस्कुरा घाटाकडे पळ काढण्यामध्ये व अणुस्कुरा घाटातील जंगलमय भागामध्ये लपून बसण्यात यशस्वी झाले होते.
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन लागलीच घटनास्थळी स्वता मा. पोलीस अधिक्षक, रत्नागिरी श्री. धनंजय कुलकर्णी यांनी भेट देऊन राजापूर पोलीस ठाणे येथील पोलीस अधिकारी व अंमलदार, आर.सी.पी व क्यु.आर.टी. रत्नागिरी चे अंमलदार, श्वान पथक तसेच नजीकच्या येरडव व पांगरी गावातील ग्रामस्थांची वेगवेगळी पथके तयार करून अणूस्कुरा घाटातील जंगलमय भागामध्ये आरोपीतांचा कसून शोध घेण्याचे निर्देश दिले.
निर्देश मिळताच अणुस्कुरा चेकपोस्ट व रायपाटण दूरक्षेत्र येथे नाकाबंदी करण्यात आली व येणाऱ्या जाणाऱ्या सर्व वाहनांची पोलीसांमार्फत कसून तपासणी करण्यात येत होती व जंगलमय भागात आर.सी.पी, क्यु.आर.टी. प्लाटून, श्वान पथक मार्फत शोध घेण्यात येत होता. या शोध मोहिमे मध्ये येरडव व पांगरी गावांचे ग्रामस्थांनी पोलीसांना मदत पुरवली तसेच एक आरोपी ताब्यात घेण्यामध्ये यश मिळवून दिले. पुढे ही शोध मोहीम अजून एक दिवस चालली व त्याच दिवशी इतर आरोपीस ताब्यात घेण्यात आले.
मुदतीत फिर्यादी यांचे दिल्या तक्रारीनुसार राजापूर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि नंबर ६३/२०२४, भा.द.वि.सं चे कलम ३९३ व ३४ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
दोन दिवसांच्या शोध मोहिमेमध्ये मिळून आलेल्या या गुन्हयातील आरोपीतांकडे पोलीस उपनिरीक्षक श्री. सुधीर उबाळे व पथकामार्फत कसून तपास करण्यात आला व १)संगमेश्वर पोलीस ठाणे गुन्हा रजि नंबर ३६/२०२४, भा.द.वि.सं चे कलम ३७९ अन्वये २)फरासखाना पोलीस ठाणे (पुणे) गुन्हा रजि नंबर १११/२०२४, भा.द.वि.सं चे कलम ३७९ अन्वये ३)कोरेगाव पार्क पोलीस ठाणे (पुणे) गुन्हा रजि नंबर ७६/२०२४, भा.द.वि.सं चे कलम ३९२, ३४ अन्वये दाखल इतार 3 गुन्हे उघडकीस आणून गुन्हयातील वापरण्यात आलेली लायटर-पिस्टल, मोटरसायकल असे एकूण 2 लाख किंमतीचा मुददेमाल हस्तगत करण्यात आलेला होता.
या गुन्हयातील आरोपीत यांच्या विरुद्ध मा. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, राजापूर यांच्याकडे मुदतीत दोषारोपपत्र पाठविण्यात आलेले होते तसेच गुन्हयातील साक्षीदार, पंच व तपासी अधिकारी यांच्या मा. न्यायालयात साक्षी होऊन गुन्हयातील आरोपीत १) अजय माणिक घेगडे, रा. राजापूर माठ, मूळ रा. ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर २) दिपक बाळासाहेब श्रीमंदिलकर, रा . रामलिंग, ता. शिरूर, जि. पुणे यांचे विरूदध सबळ पुरावा निर्माण झाल्याने मा. न्यायालयाने आरोपीत यांना काल दिनांक 16/10/2024 रोजी ०२ वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधिक्षक, रत्नागिरी, श्री. धनंजय कुलकर्णी, अपर पोलीस अधिक्षक, श्रीमती. जयश्री गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी, लांजा श्री. यशवंत केडगे यांचे मार्गदर्शनाखाली खालील नमूद पोलीस अधिकारी व अंमलदार व ग्रामस्थ यांनी केलेली आहे.
1) श्री. राजाराम चव्हाण, प्रभारी पोलीस निरीक्षक राजापूर पोलीस ठाणे,
2) श्री. सुधीर उबाळे, पोलीस उपनिरीक्षक,
3) श्री. मोबीन शेख, पोलीस उपनिरीक्षक,
4) स.पो.फौ/२८९ श्री. वाघाटे,
5) पोहवा/६०३ श्री. तळेकर,
6) अणुस्कुरा चेकपोस्ट व रायपाटण दूरक्षेत्रचे अंमलदार,
7) राजापूर पोलीस ठाणेचे अंमलदार,
8) आर.सी.पी व क्यु.आर.टी. प्लाटून, रत्नागिरी तसेच
9) मौजे येरडव व पांगरी गावांचे ग्रामस्थ.