चिपळूण:-प्रो लीग ११ वी कबड्डी स्पर्धा १८ तारखेपासून सुरुवात होत असून या स्पर्धेतील पटणा पायरेटस् संघाच्या कर्णधारपदी शुभम शिंदे चिपळूण तालुक्यातील कोळकेवाडी येथील शुभम शिंदे यांची निवड झाली आहे. या निवडीने चिपळूणचे नाव उंचावले आहे. याबदल शुभम शिंदे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
चिपळूण शहरासह ग्रामीण भागात कबड्डी खेळाला फार मोठे महत्त्व आहे. राजकीय पक्षांसह सामाजिक संस्थांच्या पुढाकाराने स्पर्धा आयोजित केल्या जातात. यातून नवोदित खेळाडू तयार होत असल्याचे आपल्याला वेळोवेळी पहावयास मिळाले आहे. विशेष म्हणजे प्रो प्रीमियर लीग कबड्डी स्पर्धेमध्ये या खेळाडूंना आपला खेळ दाखविण्याची संधी मिळाली आहे. आता तर प्रो कबड्डी ११ पर्वाच्या स्पर्धेत चिपळूण-कोळकेवाडीतील शुभम शिंदे यांची पटणा पायरेटस् संघाच्या कर्णधारपदी निवड झाली आहे.
शुभम शिंदे यांनी २०१७ पासून जुनिअर नॅशनल कबड्डी स्पर्धेत खेळायला सुरुवात केली. सलग तीन वर्षे राष्ट्रीय पातळीवर उत्कृष्ट कामगिरी करत, त्यांनी आपल्या खेळाची चुणूक दाखवली. या यशस्वी प्रदर्शनामुळे, शुभम यांनी २०२०, २०२२, आणि २०२४ या वर्षांमध्ये सिनियर नॅशनल कबड्डी स्पर्धेत खेळून आपले स्थान पक्के केले.
कबड्डी खेळातील आपली कारकीर्द त्यांनी स्थानिक वाघजाई कोळकेवाडी संघातून सुरू केली. स्थानिक कबड्डी स्पर्धांमध्येही शुभम शिंदे यांनी आपल्या खेळाने क्रीडा प्रेमींची वाहवा मिळवली. सध्या ते सेंट्रल रेल्वेमध्ये तिकीट तपासणीस म्हणून कार्यरत आहेत. दोन वेळा त्यांची इंडियन कॅम्पसाठी निवड झाली आहे. प्रो कबड्डीमध्ये पुणेरी पलटण संघातून त्यांनी पदार्पण केले. दोन वर्षे पुणेरी पलटणसाठी खेळल्यानंतर त्यांनी पटणा पायरेटस् संघात प्रवेश केला, नंतर दोन वर्ष बंगाल वॉरियर्स संघात खेळले, आणि आता पुन्हा पटणा पायरेटस् संघात परतत, त्यांची कर्णधारपदी निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
शुभम शिंदे यांची कर्णधारपदी निवड झाल्याबद्दल त्यांच्या वडिलांनी आनंद व्यक्त करत प्रतिक्रिया दिली. “शुभमला लहानपणापासूनच कबड्डीची आवड आहे. त्याचा दुसरा भाऊ आदित्यलाही कबड्डीची आवड असल्यामुळे आम्ही दोघांना आई-वडिलांनी प्रोत्साहन दिले. आज दोघेही कबड्डी क्षेत्रात नाव कमवत आहेत,” असे त्यांनी सांगितले.
शुभमचा भाऊ आदित्य याने राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्याचे कर्णधारपद भूषवताना, ६७ वर्षांनंतर पहिल्यांदाच जिल्ह्यासाठी अजिंक्यपद मिळवून दिले होते. वाघजाई कोळकेवाडी संघाचे प्रतिनिधित्व करताना शुभम आणि आदित्य यांनी जिल्हा आणि पुणे-मुंबईसारख्या ठिकाणी संघाचे नाव उज्वल करत अजिंक्यपदावर आपली मोहोर उमटवली आहे.