राजकारण्यांनी लावलेले फलक केले जप्त
चिपळूण:-विधानसभा निवडणुक आचारसंहिता मंगळवारी जाहीर होताच,नगर परिषदेने शहरात राजकारण्यांनी लावलेले फलक जप्त करण्याची कार्यवाही सुरू केली आहे. ग्रापंचायतीही गावात असलेले विकासकामांचे फलक झाकून ठेवत आहेत.
विधानसभेची निवडणूक 20 नोव्हेंबरला होत असून मतमोजणी 23 ला होणार आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी निवडणूक आयोगाने आचारसंहिता लागू केली आहे. त्यामुळे या काळात राजकारण्यांना आपली जाहिरात करणारे फलक विनापरवानगीने लावता येत नाहीत. त्यामुळे शहरात गेल्या काही दिवसांपासून झालेला दसरा व काही दिवसांनी साजऱ्या होणाऱ्या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना शुभेच्छा देणारे अनेक फलक झळकत होते. हे सर्व फलक काढण्याची कार्यवाही मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. मंगळवारी अनेक फलक काढून ते जप्त करण्यात आले आहेत.
त्यामुळे शहर काही प्रमाणात मोकळे दिसत आहे. अशा कार्यवाही ग्रामपंचायतींनी सुरू केली असून त्यांनीही विकासकामांचे फलक झाकून ठेवण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे प्रशासन आचासंहितेचे काटेकोरपणे पालन करताना दिसत आहे.