रत्नागिरी:- काही दिवसांपूर्वी शहरानजीकच्या कुवारबाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन येथे वक्फ बोर्ड कार्यालयाच्या उद्घाटनाला जाणाऱ्या पालकमंत्र्यांना काळे झेंडे दाखवणाऱ्या 11 जणांविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. 7 ऑक्टोबर रोजी दुपारी 3.30च्या सुमारास ही घटना घडली होत़ी जिल्हाधिका-यांचा मनाई आदेश असतानाही बेकायदेशीर जमाव करणे व पालकमंत्र्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न करत काळे झेंडे दाखवल्याप्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली.
सामाजिक न्यायभवन येथे नव्याने सुरु होत असलेल्या वक्फ बोर्ड कार्यालयाचा उद्घाटन समारंभ 7 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वाजता ठेवण्यात आला होता. या कार्यकमाला पालकमंत्री उदय सामंत उपस्थित राहणार होते. तसेच मुस्लिम समाजातील लोकही उपस्थित राहणार होते. वक्फ बोर्डच्या कार्यालयाला विरोध करण्यासाठी सकल हिंदु समाज संघटना रत्नागिरीचे अध्यक्ष चंद्रकांत राऊळ हे 20 ते 25 जणांसह सामाजिक न्यायभवन कुवारबाव येथे आले होते.
या ठिकाणी सकल हिंदु समाज संघटनेकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच दुपारी 3.30 च्या सुमारास येथे पालकमंत्री उदय सामंत याचा ताफा येताच संघटनेचे लोक आक्रमक झाले त्यांनी पालकमंत्री उदय सामंत यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. येथे बंदोबस्तासाठी पोलिसांनी संघटनेच्या लोकांना रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला अडवून ठेवले. मंत्री सामंत यांना सकल हिंदु समाज संघटनेकडून काळे झेंडे दाखवले, अशी नोंद शहर पोलिसात करण्यात आली आहे.
गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांमध्ये सकल हिंदु समाज संघटना रत्नागिरीचे अध्यक्ष चंद्रकांत श्रीधर राऊळ, राकेश सुरेश नलावडे, अभय दळी, नंदकुमार चव्हाण, अक्षय चाळके, राज परमार, विराज चव्हाण, हर्ष खानविलकर, सागर कदम, अमित काटे, संजय निवळकर (रा. सर्व रत्नागिरी) आदींचा समावेश आहे. त्याच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता 189(2) (3), 223(अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.