संगमेश्वर:-गाव विकास समिती रत्नागिरी जिल्हा या संघटनेमार्फत यंदा पहिल्यांदाच चिपळूण- संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. सौ अनघा कांगणे यांना गाव विकास समिती मार्फत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
गाव विकास समितीचे अध्यक्ष उदय गोताड व संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोकणातील तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न व स्थलांतर हा मुद्दा हाती घेत प्रचाराला सुरुवात करण्यात आली आहे.तसे व्हिडिओ संघटनेकडून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले आहेत. आपल्या कोकणात गावाकडे शिकणारी मुलं ही आपल्या गावांची भविष्य…आपल्या गावांचे भविष्य असणाऱ्या मुलांच्या रोजगाराचे भविष्य काय? असा प्रश्न विचारणारा व्हिडिओ गाव विकास समितीकडून सोशल मीडियावर या आधीच पोस्ट करण्यात आला आहे. त्यानंतर आता शिमगा व गणेशोत्सवात चाकरमानी आल्यानंतर गाव गजबजलेला असतो.
वर्षभर मात्र गावातील अनेक म्हातारी माणसं बाहेरगावी असणाऱ्या त्यांच्या लेकरांची वाट बघत असतात, अशा आशयाचा दुसरा व्हिडिओ देखील गाव विकास समिती मार्फत सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. गाव विकास समिती, रत्नागिरी जिल्हा संघटनेचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे व अध्यक्ष उदय गोताड यांनी कोकणातील बेरोजगारीचा मुद्दा उचलून धरला अजून या निवडणुकीत बेरोजगारी आणि स्थलांतर या विषयावर येथील जनतेने विचार करून गावांच्या भविष्यासाठी मतदान करावे,असे आवाहन गाव विकास समिती मार्फत करण्यात आले आहे. गाव विकास समितीने सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांपर्यंत बेरोजगारांनी स्थलांतर हा प्रश्न ठळकपणे नेण्याचा निर्धार केल्याचे या व्हिडिओवरून स्पष्ट होत आहे. बेरोजगारीवर तोडगा काढण्यासाठी तालुका निहाय एमआयडीसी विकसित करण्यात येतील असा आश्वासनही या व्हिडिओ मधून गाव विकास समितीने तरुणांना दिले आहे.