राजापूर:- तालुक्यातील पाचल पंचक्रोशी धनगर समाजातर्फे आयोजित जिल्हास्तरीय गजा नृत्य स्पर्धेत मिळंद (ता. राजापूर) येथील अंबाई संघाला प्रथम क्रमांक मिळाला.
धनगर समाजाचे पारंपरिक असलेल्या गजानृत्य स्पर्धा मोठ्या उत्साहात झाल्या. पाचल येथील प्रभावती हॉलमध्ये झालेल्या या स्पर्धेला जिल्ह्यातून ९ संघांनी आपली लोककला ७०० रसिक प्रेक्षकांच्या समोर सादर करून उपस्थितांची मने जिंकली. स्पर्धेत यंगस्टार ओझर संघाने दुसरा, तर लक्ष्मीमाता करक संघाने तिसरा पटकावला.
कार्यक्रमास विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आणि विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींनी हजेरी लावून धनगर समजाच्या या उपक्रमाला भरभरून शुभेच्छा दिल्या. या निमित्ताने पाचल येथे धनगर समाजासाठी समाजमंदिराची मागणी जोर धरू लागला आहे. आलेल्या राजकीय पक्षाच्या सर्वच नेत्यांनी लवकरात लवकर समाज मंदिरासाठी जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिलेले आहे. त्याकरिता पुढील काळात धनगर समाजाची वज्रमूठ कायम ठेवण्याचे आवाहन समाजाच्या कार्यकर्त्यांनी जमलेल्या प्रेक्षकांना केले.