सुरेश दसम/ कोंड्ये:-तालुक्यातील कोंडये देवाळाचीवाडी येथे बिबट्याने घराच्या शेजारील खुराड्यातून दोन कोंबड्या पळवल्याची घटना शनिवारी 12 ऑक्टोबर रोजी घडली. बिबट्या घराजवळ येऊन कोंबड्या फस्त केल्याने कोंड्ये गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कोंड्ये देवळाचीवाडी येथील नथुराम रामचंद्र शितप यांनी आपल्या घराशेजारी एक कोंबड्यांसाठी खुराडा केला होता. यामध्ये कोंबड्या होत्या. शनिवारी रात्री गावातील ग्रामस्थ मंडळी गावदेवीच्या मंदिरात कार्यकमासाठी गेलेले असताना मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने खुराडयावर झडप घालून दोन कोंबड्यांना उचलून नेत फस्त पेले. पहाटे 4 च्या दरम्याने कोंबडयाच्या आवाजाने नथुराम शितप यांच्या शेजारील काही व्यक्तींनी धाव घेतली असता खुराड्यातून कोंबडा आणि कोंबडी बिबट्याने उचलून नेल्याचे दिसून आले. खुराड्याचा दरवाजा तुटलेला दिसून येत होता. बिबट्याने घराजवळ असलेल्या कोंबड्यांना उचलून नेल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. रात्रीच्या सुमारास बाहेर पडणार कसे अशी भीती ग्रामस्थांना वाटत आहे. बिबट्याचा बंदोबस्त करावा यासाठी ग्रामस्थांनी पोलीस पाटील व वनविभागाला याबाबत माहिती दिली आहे. लवकरात लवकर बिबट्याचा बंदोबस्त करून ग्रामस्थांची भीती दूर करावी अशी मागणी होत आहे.