गुहागर पोलिस ठाण्यात तीघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल
गुहागर:- मेडिकल ऍडमिशन कौन्सीलर असल्याचे भासवून एमबीबीएसला ऍडमिशन करून देतो असे खोटे सांगत तब्बल 13 लाखाला गंडा घातल्याचा प्रकार गुहागरमध्ये घडला आहे. या प्रकरणी गुहागर पोलिस ठाण्यामध्ये तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुहागर पोलिस ठाण्यामध्ये चिखली, साळवीवाडी येथील किरण संपतराव सन्मुख यांनी आपली फसवणुक झाल्याची फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादी यांची दि. 1 सप्टेंबर 2024 ते 6 ऑक्टोबर 2024 या कालावधीत फसवणुक केली आहे. दाखल केलेल्या तक्रारीमध्ये फिर्यादीला हिमांशी मिश्रा, जयंत मिश्रा आणि उमंग मिश्रा यांनी फोन करून त्यांच्या कुटुंबियांना वारंवार संपर्क करून ते मेडिकल ऍडमिशन कौन्सीलर असल्याचे भासवून त्यांनी फिर्यादी यांचा मुलगा रामकृष्ण यास एमबीबीएस ला ऍडमिशन करून देतो असे खोटे आश्वासन देवून त्याद्वारे फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून संगणकीय माध्यमाद्वारे फिर्यादी याचा मुलगा रामकृष्ण याच्या जीमेल आयडीवर ऍडमिशन पकियेसाठी बनावट लिंक पाठवून त्यावर फिर्यादी व त्यांचे कुटुंबियांची माहिती टाकण्यास भाग पाडले.
त्यानंतर इलेक्ट्रॉनिक स्वरूपात बनावट अलाईनमेंट लेटर पाठवून ऍडमिशन प्रक्रियेवर पैशाची मागणी करून रूपये 13 लाख एनइएफटी द्वारे ट्रान्सफर करावयास लावून फिर्यादी यांची फसवणुक केली आहे.
यापकरणी गुहागर पोलिस ठाण्यामध्ये बुधवारी रात्री 11.19 वाजता हिमांशु मिश्रा, जयंत मिश्रा व उमंग मिश्रा या अनोळखी पत्ता माहित नसलेल्या व्यक्तींवर भारतीय न्यायसंहिता अधिनियम 2023 चे कलम 316(2), 318(4), 336(3), 340(2), 3(5), माहीती तंत्रज्ञान अधिनियम कलम 66 (ड) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.