रत्नागिरी:-शहरालगतच्या कुवारबांव परिसरात मटका-जुगार चालविणा-या दोघा संशयितांवर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. 9 व 10 ऑक्टोबर रोजी ही कारवाई करण्यात आली. निहाल करीम होडेकर (24) व प्रवीण वासुदेव शिंदे (56) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्या ताब्यातून पोलिसांनी रोख रक्कम व जुगाराचे साहित्य हस्तगत केले.
कुवारबांव परिसरात मटका-जुगार चालविला जात असल्याची गोपनिय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार 9 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6.25 वाजयाच्या सुमारास पोलिसांनी रेल्वे स्टेशन स्टॉप मागील परिसरात छापा टाकून कारवाई केल़ी यावेळी निहाल हा मटका-जुगार चालवत असल्याचे आढळून आले.
तर 10 ऑक्टोबर रोजी कुवारबांव ते काजरघाटी येथील रस्त्यावर असलेल्या टपरीच्या आडोशाला मटका-जुगार चालवला जात असल्याचे पोलिसांना दिसून आले. याप्रकरणी प्रवीण शिंदे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.