रत्नागिरी:- शहरातील लोकमान्य टिळक स्मारक मंदिर व शासकीय ग्रंथालय परिसरात अतिक्रमण करून मजार बांधल्याप्रकरणी 50 वर्षानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मागील अनेक वर्षापासून या मजार प्रकरणी वाद-विवाद समोर येत होते. ही मजार हटवण्याची मागणीही करण्यात येत होती. अखेर आता अनधिकृतरित्या बांधकाम केल्याप्रकरणी शहर पोलिसात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
झाकीर गुलाब सय्यद (56, रा.रत्नागिरी) यांनी या प्रकरणी शहर पोलिसात तक्रार दाखल केली.
शहरातील खारेघाट रोड येथील लोकमान्य टिळक शासकीय ग्रंथालय परिसरातील एका बाजूला मजार आहे. ही मजार 1973 सालापूर्वीपासून या ठिकाणी असल्याचे सांगण्यात आले. शासकीय जागा असताना येथे ही मजार कुणी बांधली, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता. येथे असलेल्या झाडीमुळे यापूर्वी ही मजार दिसून येत नव्हती. मागील काही वर्षापासून या ठिकाणी साफसफाई करण्यात आल्यानंतर ही मजार सर्वांच्याच नजरेस पडू लागली.
शासकीय जागेत असलेल्या या मजारविषयी अनेकांनी आक्षेप घेतले होते. तसेच ही मजार या ठिकाणाहून हटवावी, अशीही मागणी करण्यात आल़ी दरम्यान हा सर्व प्रकार विवादित असल्याने प्रशासनाकडून हटवण्यासंबंधी कोणतेही पाऊल उचलण्यात आले नव्हते. नुकतेच लोकमान्य टिळक ग्रंथालयाचे नूतनीकरण करण्यात आल्यानंतर मजार हटवण्यासंबंधीची मागणी जोर धरु लागली होती. अखेर झाकीर सय्यद यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध भारतीय न्याय संहिता अधिनियम 2023 चे कलम 329 (3) प्रमाणे गुन्हा दाखल केला.