मुंबई:-भारतीय उद्योग जगताचे पितामह रतन टाटा यांच्या पार्थिवावर वरळीतील पारसी स्मशानभूमीत २१ बंदुकींची मानवंदना देत शासकीय इतमामात आणि अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
तत्पूर्वी त्यांच्यावर प्रार्थना सभागृहात पारसी पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले. रतन टाटा यांचे पार्थिव प्रथम प्रार्थनागृहात ठेवण्यात आले. त्याठिकाणी पारशी परंपरेतील ‘गेह-सारणू’चे वाचन करण्यात आले. त्यांच्या पार्थिवाच्या तोंडावर कापडाचा तुकडा ठेवून ‘अहनवेती’चा संपूर्ण पहिला अध्याय वाचला गेला. ही शांती प्रार्थनेची प्रक्रिया आहे. यानंतर विद्युत दाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, रतन टाटा यांचा लाडका श्वान ‘गोवा’ यानंही त्यांना श्रद्धांजली वाहिली.
टाटा यांच्या पार्थिवाचे राजकीय, उद्योग, मनोरंजन, क्रीडा आदी सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी अंत्यदर्शन घेतले. यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, उद्योगपती मुकेश अंबानी, उद्योगपती गौतम अदानी, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री पियुष गोयल, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, खासदार सुप्रिया सुळे, मंत्री छगन भुजबळ, माजी मंत्री आदित्य ठाकरे, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार, माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, दिग्दर्शक मधू भांडारकर, ईशा अंबानी, आनंद पिरामल यांनी देखील रतन टाटा यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेत श्रद्धांजली वाहिली.