२५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध
लांजा : छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या लांजा तालुक्यातील शिवकालीन गढीला पुन्हा एकदा नवीन झळाली मिळणार आहे.
भाजपाच्या लांजा राजापूर विधानसभा निवडणूक प्रमुख उल्का विश्वासराव यांनी यासाठी २५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे .
लांजा तालुक्याच्या पश्चिम भागात साटवली येथे शिवकालीन गढी (बंदर) आहे. छत्रपती शिवरायांच्या काळात या ठिकाणी साटवली नदीतून गलबतातून येणारा माल साटवली गढी या ठिकाणी साठवला जात असे. त्यामुळे या गढीला साटवली असे नाव पडल्याचा दाखला आहे. मात्र काळाच्या ओघात या ऐतिहासिक ठेव्याचे जतन केले गेले नसल्याने या गढीची पार दुरवस्था झाली आहे. वाढलेले गवत, झाडे झुडपे , पालापाचोळा यांमुळे आजघडीला या ऐतिहासिक ठेव्याचे रूपच पालटून गेले आहे. काळाच्या ओघात ही गढी नामशेष होण्याच्या मार्गावर आहे .
या गढीचा असलेला शिवकालीन इतिहास लक्षात घेता गेल्या काही वर्षांपासून शिवगंध प्रतिष्ठान लांजा आणि दुर्गवीर प्रतिष्ठान यांच्याकडून या गढीची स्वच्छता आणि संवर्धन मोहीम राबवण्यात येते. मात्र या गढीची शासनाकडून किंवा पुरातत्व खात्याकडून कोणत्याही प्रकारे जपणूक न केल्याने तीची दुरावस्था होत आहे.
ही बाब लक्षात घेऊन भाजपाच्या लांजा राजापूर विधानसभा निवडणूक प्रमुख उल्का विश्वासराव यांनी साटवली येथील शिवकालीन गढीवर मूलभूत सुविधांच्या विकासासाठी २५ लाख रुपयांचा निधी राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे आजवर दुर्लक्षित आणि नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या गढीला पुन्हा एकदा नवीन झळाळी प्राप्त होणार आहे. याबद्दल साटवली ग्रामस्थ व शिवप्रेमीतून समाधान व्यक्तकेले जात आहे.