पेण पोलिसांची धडक कारवाई
खेड:-कोकण मार्गावर रेल्वेमधून पवास करणा-या महिला प्रवाशांच्या सोन्याच्या दागिन्यांसह प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्या सराईत चोरट्यास पेण पोलिसांनी शिताफीने जेरबंद केले. भगवान तुकाराम महाडिक (रा. कोलाड-रायगड) असे सराईत चोरट्यांचे नाव आहे.
या संशयित चोरट्याच्या अटकेने रेल्वेगाड्यांतील अन्य चोऱ्या उघडकीस येण्यी शक्यता आहे.
कोकण मार्गावर रेल्वेगाड्यांतून महिला प्रवाशांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून घेण्याचे प्रकार वाढले होते. आसनांवर झोपलेल्या प्रवाशांच्या डोक्याखाली असलेले मोबाईलही चोरट्याकडून लांबवले जात होते. ठाणे, वडखळ, पेण दरम्यानही रेल्वेगाड्यांमध्ये चोऱ्यांचे प्रमाण वाढले होते. या पार्श्वभूमीवर पेण पोलिसांनी चोऱ्यांचा छडा लावण्यासाठी सापळा रचला होता. या सापळ्यात भगवान महाडिक या सराईत चोरट्यास पेण पोलिसांनी रंगेहाथ पकडले. पेण व वडखळ स्थानकात घडलेल्या चोऱ्यामध्ये या सहभाग असल्याचे तपासात उघड झाले आहे. या दृष्टीने पेण पोलिसांकडून कसून तपास करण्यात येत आहे. कोकण मार्गावर अन्य स्थानकांवरही घडलेल्या चोऱ्या उघडकीस आणण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली.