खेड:-ओबीसी-व्हीजेएनटी संघर्ष समन्वय समिती व खेड ओबीसी-व्हीजेएनटी कर्मचारी संघाच्या संयुक्त विद्यमाने आज झालेल्या विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.
भरणे येथील गणेश मंगल कार्यालयात हा सोहळा झाला. प्रमुख पाहुणे म्हणून ओबीसी नेते संतोष जैतापकर, राजेश बेंडल, ओबीसी नेते व माजी जि.प. सदस्य श्री. प्रकाश शिगवण, ओबीसी जनमोर्चा रत्नागिरी उपाध्यक्ष मिलिंद इवलेकर, संघटनेचे अध्यक्ष दिपक शिगवण व कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सचिन गोवळकर, इत्यादी उपस्थित होते.
यावेळी इयत्ता दहावी, बारावी, पदवीधर, इंजिनियर, डॉक्टर, डी-फार्मसी/बी-फार्मसी, डिप्लोमाधारक, पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थी, राज्य व देश पातळीवर विशेष प्रावीण्य मिळविलेले खेळाडूं अशा पाचशे विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी विद्यार्थी व पालक गुणगौरव सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सम्राट अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष रोहित दीपाली संतोष मते (सावर्डे) यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेबाबत मार्गदर्शन केले. प्रास्ताविकात कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सचिन गोवळकर यांनी ओबीसी समाजातील सामाजिक, शैक्षणिक व राजकीय समस्या, अडचणी, येत्या काळातील आपला संघर्ष, एकजुटीने लढण्याची गरज याबाबत भाष्य केले. प्रमुख मान्यवरांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.