लांजा:-इको कारमधून विनापरवाना गावठी हातभट्टीची दारू वाहतूक करणाऱ्या तिघांवर लांजा पोलिसांनी कारवाई करताना कारसह गावठी हातभट्टीची दारू असा एकूण २ लाख ५० हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई शनिवार ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७.१५ वाजता देवधे फाटा येथे करण्यात आली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इको कारमधून गावठी हातभट्टीच्या दारूची विक्री होत असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार लांजा पोलिसांनी शनिवारी सायंकाळी ७.१५ च्या सुमारास देवधे फाटा येथून जाणारी इको कार क्र.(एम एच.०१ एव्ही.६३४९) ही थांबवली असता या कारमध्ये गावठी हातभट्टीचा दारूसाठा आढळून आला.
विनापरवाना गावठी हातभट्टीच्या दारूची कारमधून वाहतूक केल्याप्रकरणी लांजा पोलिसांनी कारमधील गौरव नंदकुमार चव्हाण (वय ३७, रा.मिरजोळे जांभूळफाटा, ता.रत्नागिरी), शिवजित सुनील पाटील (रा.मिरजोळे पाटीलवाडी) तसेच बाळकृष्ण वामनसे (रा.झापडे, ता.लांजा) या तिघांना ताब्यात घेतले. या कारवाईत दारू वाहतूक करताना वापरण्यात आलेली २ लाख ३० हजार किंमतीची मारुती सुझुकी इको कार आणि २० लिटर मापाचे पांढऱ्या रंगाचे १० प्लास्टिक कॅन एकूण २० हजार २५० रुपये किंमतीची २०० लिटर गावठी हातभट्टीच्या दारू. असा एकूण २ लाख ५० हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
विनापरवाना गावठी हातभट्टीच्या दारूच्या वाहतुकी प्रकरणी पोलिसांनी या तिघांवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ चे कलम ६५ (अ) (ई) ८३ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र कांबळे हे करत आहेत.