दापोली:-दापोली शहरातील सुधीर होनवले या सेवानिवृत्त मुख्याध्यापकाला फेसबुक व व्हाट्सअप च्या माध्यमातून कर्जाचे आमिष दाखवीत सुमारे 1 लाख 72 हजार 554 रुपयाची फसवणूक केल्याची घटना 29 जुलै रोजी सकाळी 10 वाजता घडली.
दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुधीर होनवले यांना 29 जुलै रोजी व्हाट्सॲप व फेसबुकच्या माध्यमातून आरोपी विकास बर्मन , चेतन रमेश धुरी,संजीव कुमार, अश्विन कुमार पत्ता माहित नाही यांनी संपर्क केला. संपर्क करणा-यांनी 10 लाखाचे कर्ज तात्काळ उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले. कर्जाच्या प्रोसेसिंग करिता काही रक्कम भरणे आवश्यक आहे. तसेच जीएसटी वगैरे खर्च धरून 1 लाख 72 हजार 554 रुपये व्हाट्सअप व फेसबुकच्या माध्यमातून मागण्यात आले. हे पैसे होनवले यांनी दिले.
त्यानंतर कोणत्याही प्रकारे कर्जाची पूर्तता करण्यात आली नाही. चारही आरोपींनी वेगवेगळ्या नंबर वरून होनवले यांना संपर्क करून फसवणूक केल्याचे निदर्शनास आल्यानंतर होणवले यांनी दापोली पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली चारही आरोपींच्या विरोधात भारतीय न्याय संहिता 2023 कलम 318 (4) 3 (5 )माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम 66 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा अधिक तपास दापोली पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक विवेक अहिरे करीत आहेत.