रत्नागिरी:-राज्यात 55 हजार रेशन दुकानदार असून अनेक वर्षांपासून शासनाने दुकानदारांच्या कमिशनमध्ये वाढ न केल्यामुळे सर्व स्वस्त धान्य दुकानदारांनी 1 नोव्हेंबरपासून संपावर जाण्याचा निर्णय घेतल्याची माहिती महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघ, आणि ऑल इंडिया फेयर प्राईस शॉप डिलर्स फेडरेशन या दोन्ही संघटनांनी दिला आहे. त्या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिले आहे.
या बाबत प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनानुसार, धान्य दुकानदारांच्या कमिशनमध्ये वाढ करावी, अशा आशयाचे निवेदन अनेकवेळा शासनास दिले. पदाधिका-यांबरोबर शासनाने बैठकाही घेतल्या. परंतु आश्वासनाव्यतिरिक्त दुकानदारांच्या पदरात काहीच पडले नाही. त्यामुळे राज्यात असलेल्या स्वस्त धान्य दुकानदारांच्या दोन्ही संघटनांनी एकत्र येत आपल्या विविध मागण्यांसंदर्भात श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन, अमरावती येथे नुकता मेळावा घेतला. या मेळाव्यास दोन्ही संघटनांचे राज्यातील प्रतिनिधी उपस्थित होते. आपल्या मागण्यांबाबत शासन उदासीन असल्यामुळे सर्वानुमते 1 नोव्हेंबरपासून धान्य दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला आहे.
कमिशनमध्ये वाढ करावी, याबरोबरच मे 2022 मध्ये मोफत वाटप केलेल्या धान्याचे कमिशन मिळावे. नोव्हेंबर 2022 मध्ये रोख चलनाने भरलेले पैसे त्वरीत मिळावे. दरमहा विक्री होते केलेल्या मालाचे कमिशन दरमहाच मिळावे. अनेक दुकानदारानी प्रधानमंत्री मोफत धान्य वितरीत केले हे धान्य उशिरा मिळाले त्याचे दुकानदारांनी वाटपही केले. परंतु कॅरी फॉरवर्डच्या नावाखाली त्या धान्याचे कमिशन दुकानदारांना देण्यात आलेले नाही. ते त्वरीत मिळावे या प्रमुख मागण्यांसह अनेक मागण्या संघटनेच्या आहेत.
आपल्या मागण्यांचा शासनाने विचार केला नाही तर 1 नोव्हेंबरपासून दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघ आणि ऑल इंडिया फेयर प्राईस शॉप डिलर्स फेडरेशन या दोन्ही राज्य संघटनेचे वरिष्ठ पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष यांचा संयुक्त मेळावा अमरावती येथे पार पडलेल्या मेळाव्यात होते.