गुहागर/उदय दणदणे:-गुहागर आगारात तीन शिवशाही बस देण्यात येणार आहेत, मात्र त्या शिवशाही बस जुन्या देण्यात येणार असल्याची माहिती उपब्धत झाली आहे.जर गुहागर आगाराला जुन्या शिवशाही गाड्या देण्यात आल्या तर गुहागर तालुका प्रवाशी संघटना त्याला तीव्र विरोध करेल असा इशारा संघटना अध्यक्ष पराग कांबळे यांनी एसटी प्रशासनाला दिला आहे.
गुहागर आगारात लालपरी गाड्या कमी असल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. गुहागर आगारात एकूण २९ लालपरी आहेत. त्या नवीन मिळाव्यात, जुन्या शिवशाही गाड्या गुहागर प्रवाशी जनतेच्या माथी मारण्यात येत असतील तर गुहागर आगाराचे नुकसान आहे. संबंधित अधिकारी यांनी याकडे जातीने लक्ष घालावे, अशी मागणी गुहागर तालुका प्रवाशी संघटनेचेवतीने करण्यात येत आहे.
गुहागर आगारातील आवक देणाऱ्या गाड्या जाणूनबुजून बंद करण्यात आल्याचे कांबळे यांनी सांगत त्याचबरोबर ग्रामीण भागात गाड्या उपलब्ध नसल्याने प्रवाशी वर्गाचे व शालेय विद्यार्थी यांचे खूप मोठे नुकसान व ससेहोलपट होत आहे. गुहागर आगाराच्या माथ्यावर जुन्या गाड्या माथी मारू नयेत असा इशारा गुहागर तालुका प्रवाशी संघटनेने दिला आहे.