राजापूर:-तालुक्यातील नाटे बांदकरवाडी येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभागाने ग्रामस्थांच्या मदतीने अथक परिश्रमाने सुरक्षित पिंज-यात पकडून जीवदान दिले. हा बिबट्या मादी जातीचा असून सुमारे 2 ते अडीज वर्षे वयाचा असल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली.
नाटे बांदकरवाडी येथील सुरेश कृष्णा थळेश्री यांच्या मालकीच्या विहिरीत शनिवारी सकाळी 6 च्या सुमारास बिबट्या पडल्याची माहिती नाटे सरपंच संदीप बांदकर यांनी परिमंडळ वनाधिकारी राजापूर यांना दिली. त्यानंतर वनविभागाचे अधिकारी रेस्क्यू टीमसह घटनास्थळी दाखल झाले. रेस्क्यू टीमने ग्रामस्थांच्या सहकार्याने बिबट्याच्या सुटकेसाठी विहिरीत पिंजरा सोडल्यानंतर बिबट्याने पिंज-याच्या दरवाजाची दोरी तोडल्याने पिंज-याचा दरवाजा विहिरीच्या पाण्यात पडला. या दरम्यान बिबट्याने पिंज-यावर चढून वरती उडी मारण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव संपूर्ण विहिरीला वरून जाळी लावण्यात आली होती. जवळपास दिड ते दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर बिबट्याला पिंज-यात जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले. त्यानंतर पशुधन विकास अधिकारी चोपडे यांनी बिबट्याची वैद्यकीय तपासणी केली असता बिबट्या सुस्थितीत असल्याची खात्री पशुवैद्यकीय अधिकारी यांनी केली. हा बिबट्या मादी असून तिचे वय सुमारे 2 ते अडीच वर्ष आहे. दरम्यान या बिबट्याला वनविभागाने नैसर्गिक अधिवासात मुक्त केले. विहिरीत बिबट्या पडल्याची बातमी काही वेळातच नाटे परिसरात पसरल्यामुळे मोठ्या प्रमाणावर बघ्यांनी गर्दी केली होती. तसेच सागरी पोलीस ठाणे नाटेचे कर्मचारीही घटनास्थळी उपस्थित होते. विभागीय वनाधिकारी गिरिजा देसाई व सहाय्यक वनसंरक्षक चिपळूण प्रियांका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली रेस्क्युची कार्यवाही करण्यात आली.
या कामगिरीसाठी विभागीय वनाधिकारी गिरीजा देसाई, सहाय्यक वनसंरक्षक प्रियांका लगड, रत्नागिरी-चिपळूण, वनक्षेत्रपाल रत्नागिरी प्रकाश सुतार, राजापूर वनपाल जयराम बावदाणे, लांजा वनपाल सारीक फकीर, राजापूर वनरक्षक राजापूर विक्रम पुंभार, कोर्ले वनरक्षक श्रावणी पवार व रेस्क्यू टीमचे दीपक चव्हाण, विजय म्हादये, दीपक म्हादये, नितेश गुरव, संतोष चव्हाण, नीलेश म्हादये यांच्यासह रूपेश कोठारकर, नाटे सरपंच संदीप बांदकर, पोलीस कॉन्स्टेबल कुसाळ व ठीक तसेच प्रसाद मोदी, संदीप डुगिलकर, दीपक लाड, नितीन थळेश्री, संतोष चव्हाण, सरफराज हातवडकर व नाटे ग्रामस्थ उपस्थित होते.