मुंबई:-एसटीच्या आरक्षणास धक्का लागू नये, यासह अन्य मागण्यांबाबत सत्ताधारी आमदार तथा विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. ही भेट निष्फळ ठरल्यानंतर झिरवाळ यांच्यासह दोन आमदारांनी मंत्रालयातील संरक्षक जाळीवर उड्या मारल्या.
त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.
गेल्या काही दिवसांपासून आदिवासी समाजासाठी नरहरी झिरवाळ आंदोलन करत आहे. त्यांनी आदिवासी समाजाच्या प्रश्नासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दोन वेळा भेट घेतली होती. मुख्यमंत्री आमचे ऐकत नसतील तर आमच्याकडे प्लॅन बी आहे, असे झिरवाळ यांनी म्हटले होते. त्यानुसार झिरवाळ आणि इतर दोन आमदारांनी संरक्षक जाळीवर उडी मारली. त्यानंतर झिरवाळ यांची प्रकृती बिघडली. त्यांचा रक्तदाब वाढला. त्यांच्या तपासणीसाठी डॉक्टरांची टीम मंत्रालयात पोहोचली होती.
आदिवासी आरक्षणाअंतर्गत धनगरांना आरक्षण देऊ नये, पेसा कायद्यांतर्गत भरती करण्याची मागणी या आमदारांची आहे. आपल्या मागण्यांसाठी आदिवासी समाजातील आमदार आणि खासदारांनी मंत्रालयात ठिय्या मांडला होता. त्यात किरण लहामटे, हेमंत सावरा, काशीराम कोतकर यांचा समावेश होता. आमदार आणि खासदार मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी मंत्रालयात आले होते. परंतु मुख्यमंत्र्यांनी भेट दिली नाही, असे किरण लहामटे यांनी सांगितले.
काल सकाळपासून आदिवासी आमदारांचं मंत्रालयामध्ये आंदोलन सुरु होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाही या आमदारांनी अडवलं होतं. अशी या आंदोलनकर्त्या आमदारांची मागणी आहे.