नवी दिल्ली : मोदी सरकारने मोठी घोषणा केली असून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आल्याचे जाहीर केले आहे. महाराष्ट्रासाठी हा आनंदाचा क्षण असून मराठी भाषा आता सातासमुद्रापार जाऊन पोहोचणार आहे.
आज गुरुवारी (ता. 03 ऑक्टोबर) केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारने हे मोठे आणि मराठी भाषेच्यादृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. तसेच, यावेळी मराठीसह पाली, प्राकृत, आसामी आणि बंगाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आल्याचे जाहीर केले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यात यावा, अशी मागणी होत होती. मिळालेल्या माहितीनुसार, 12 जुलै 2013 रोजी रंगनाथ पठारे यांच्या समितीने एक अहवाल तयार करून केंद्र सरकारकडे पाठवला होता. अखेर इतक्या वर्षांच्या मागणीनंतर मोदी सरकारने मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. तसेच, बंगाली, असामी, पाली आणि प्राकृत भाषेलादेखील अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. यामुळे आता महाराष्ट्रातील साहित्यिकांना याचा मोठा फायदा होणार आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर यासंदर्भातील घोषणा केली. “आमच्याकडे आतापर्यंत ज्या नोटिफाईड अभिजात भाषा होत्या. त्यामध्ये कन्नड, तेलुगु, मल्याळम या भाषांचा समावेश होता. नव्या भाषेसाठी प्रस्ताव मांडण्यात आला. त्यानंतर या भाषा फ्रेम वर्कमध्ये बसल्या आणि त्यांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला. आता ज्या नव्या भाषा येणार त्यांनाही याच फ्रेमवर्कमध्ये बसवले जाणार आहे,” अशी माहिती अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे.