गुरुवारपासून स्वरूपानंद व्याख्यानमालेदरम्यान वितरण होणार
रत्नागिरी : स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळातर्फे (पावस, रत्नागिरी) स्वरूप योगिनी पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. रत्नागिरीतील स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. तोरल शिंदे, दिव्यांगांसाठी कार्यरत आस्था सोशल फाउंडेशनच्या संस्थापिका सुरेखा पाथरे आणि उद्योजिका सुनिता गोगटे यांची निवड करण्यात आली. येत्या गुरुवारपासून दि. ३ ते ५ ऑक्टोबरला या पुरस्कारांचे वितरण शहरातील वरची आळी येथील अध्यात्म मंदिरात स्वरूपानंद व्याख्यानमालेदरम्यान करण्यात येणार आहे.
कोकणात वंध्यत्व निवारणाच्या कार्यासाठी प्रसिद्ध स्त्री रोगतज्ज्ञ डॉ. तोरल नीलेश शिंदे काम करत आहेत. डॉ. शिंदे यांनी कोकणातील पहिले रत्नागिरी टेस्ट ट्यूब बेबी सेंटर २०१४ साली सुरू करून अनेक महिलांना अपत्यप्राप्तीसाठी एक आशेचा किरण दाखवला. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या रत्नागिरी शाखेच्या अध्यक्ष, सचिव, महिला शाखेच्या अध्यक्ष अशा विविध पदांवर काम केले आहे. यापूर्वी त्यांना रत्नागिरी गौरव पुरस्कार, धन्वंतरी पुरस्कार, आयएमए आनंदीबाई पुरस्कार, इस्सार युथ आयकॉन अॅवॉर्ड मिळाले आहेत.
सुरेखा देवराम पाथरे यांनी सुरवातीला जिल्हा परिषदेत सामाजिक शास्त्रज्ञ व जलस्वराज्य प्रकल्पात महिला सक्षमीकरण अधिकारी म्हणून काम केले. त्यांचा मुलगा स्वमग्न आहे, हे समजल्यानंतर आस्था सोशल फाउंडेशनची स्थापना करून दिव्यांगांसाठी काम सुरू केले. स्वमग्न, मूकबधिर, मतिमंद, अस्थिव्यंग अशा विविध दिव्यांग व्यक्तींचे पुनर्वसन हे ध्येय घेऊन कार्य सुरू आहे. अर्ली इंटरव्हेंशन सेंटर, थेरपी, वाचा उपचार व्यवसाय, भौतिक उपचार, विशेष प्रशिक्षण, दिव्यांग वकिली केंद्र, हेल्पलाईन, शासकीय परवाने सवलतीचे उपचार व निधी मार्गदर्शन, कायदेशीर पालकत्व अशा अनेक गोष्टींसाठी आस्था काम करते. यापूर्वी त्यांना श्रीमती यमुनाबाई खेर ट्रस्टचा यमुनाबाई खेर पुरस्कार प्राप्त आहे.
सौ. सुनिता यशवंत गोगटे या मावळंगे गावच्या रहिवासी असून कोकणी मेवा उद्योजिका आहेत. लघुउद्योगामध्ये कामगार वर्गाबरोबर नोकर-मालक नात्याऐवजी सहकारी, मैत्रिणीचं नातं जपले आहेत. समाजात विभक्त कुटुंबे वाढत असली तरी एकत्र कुटुंब पद्धतीचा अंगिकार करून समाजाचे प्रबोधन त्या करतात.
व्याख्यानमाला आणि पुरस्कार वितरण सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळाच्या अध्यक्ष शिल्पा पटवर्धन, कार्याध्यक्ष जयंत देसाई आणि कार्यवाह हृषिकेश पटवर्धन यांनी केले आहे.