राजापुरातील घटना, कोल्हापुरातील दोघांवर गुन्हा
राजापूर : एका महिन्यात चारचाकी देतो सांगून तब्बल ४३ लाख ५३ हजाराला चुना लावल्याची घटना राजापूर तालुक्यातील नाटे येथे घडली आहे. या प्रकरणी कोल्हापूर येथील ओमकार राजेंद निकम आणि एका महिलेविरोधात नाटे पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फसवणुकीचा हा प्रकार ३ ऑगस्ट ते २८ सप्टेंबर २०२४ या कालावधीत घडला. ओमकार निकम आणि त्याच्यासमवेत असणाऱ्या महिलेने फिर्यादी यांचे वडील व साऱ्यांना नवीन चारचाकी एका महिन्यात देतो, असे सांगितले. त्यासाठी त्याने फिर्यादीकडून १९ लाख ३ हजार रुपये घेतले होते. तसेच फिर्यादी यांचे सहकारी मित्र सिद्राम निंगप्पा कांबळे यांच्याकडून १४ लाख आणि युवराज सखाराम हुजरे यांच्याकडून १० लाख ५० हजार रुपये घेतले होते.
फिर्यादी याने गाडीसाठी तब्बल ४३ लाख ५३ हजार रुपये ओमकार आणि महिलेला दिले होते. मात्र, त्यानंतर दोघांनी सांगितल्याप्रमाणे गाडी दिलेली नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीने याबाबत नाटे पोलिसांना माहिती दिली.