रत्नागिरीतील प्रकार, विनयभंगाचा गुन्हा दाखल
रत्नागिरी:-तरुणीची छेड काढल्याच्या रागातून रत्नागिरीतील एका संस्थेच्या अध्यक्षाला बेशुद्ध होईपर्यत मारहाण करण्यात आली. पीडित तरुणीने पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून त्या अध्यक्षावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास विठ्ठल मंदिर समोरील जागेत घडल़ी. महेश गर्दे अशी मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. मारहाणीनंतर गर्दे हे बेशुद्ध झाल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. छेड काढल्यापकरणी तरुणीकडून रत्नागिरी शहर पोलिसांत गर्दे याच्याविरुद्ध तकार दाखल करण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.
गर्दे हे विठ्ठल मंदिर येथील परिसरात एक हॉटेल चालवितात़ तसेच शहरालगत त्यांचे एक कार्यालय आहे. या कार्यालयात काम करत असताना गर्दे याने आपली छेड काढली असा आरोप एका तरुणीकडून करण्यात आला, तसेच कार्यालयात घडलेली घटना या तरुणीने आपल्या नातेवाईकांना सांगितली. तरुणीने सांगितलेल्या घटनेनंतर तिच्या नातेवाईकांचा संतापाचा पारा चढला. या प्रकाराचा जाब विचारण्यासाठी 29 सप्टेंबर रोजी महेश गर्दे हे चालवित असलेल्या विठ्ठल मंदिर येथील हॉटेलमध्ये पीडित मुलीचे नातेवाईक आले.
दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास गर्दे हे हॉटेलमध्येच असताना चार ते पाच जणांनी हॉटेलमध्ये येवून महेश गर्दे यांना छेडछाड विषयी जाब विचारण्यास सुरुवात केली, तसेच शिवीगाळ करत हाताच्या थापटाने, लाथाबुक्क्यांनी मारहाण केल़ी. या मारहाणीत महेश गर्दे हे बेशुद्ध पडले. याठिकाणी उपस्थित असलेल्या स्थानिकांनी तातडीने महेश यांना उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालय येथे दाखल केले, तसेच पुढील उपचारासाठी शहरातील खासगी रुग्णालयात दाखल केले.
महेश हे बेशुद्ध अवस्थेत असल्याने मारहाण करणाऱ्यांची नावे अद्याप समोर येवू शकली नाही. सोमवारी सायंकाळी उशीरा महेश गर्दे हे शुद्धीवर आल्यानंतर पोलिसांकडून त्यांचा जबाब नोंदविण्याची कार्यवाही सुरू होती. त्यानुसार गुन्हा दाखल केला जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.