पोलिसांकडून शोध सुरू
रत्नागिरी:-भोस्ते घाटातील मृतदेह प्रकरणामध्ये वारंवार गुंता वाढत चालला आहे. गेली 15 दिवस सुरू असलेल्या या तपासात आणखी ट्विस्टही वाढत आहे. आता आणखी वेगळी माहिती समोर येत आहे. पोलिसांना
स्वप्नात मृतदेह आपल्याला मदतीची याचना करतोय असे सांगणारा सावंतवाडी- आजगावमधील योगेश आर्या हा तरुण बेपत्ता झाला आहे. यामुळे पोलिसांच्या डोक्याला पुन्हा त्रास होणार आहे. कारण भोस्ते घाटातील या मृतदेह प्रकरणातील एकमेव साक्षीदार आहे. एकीकडे पोलिसांकडून मृतदेहाची ओळख पटवण्याची प्रयत्नांची शर्थ सुरू असताना बेपत्ता झालेल्या तरुणाचा शोध घेण्यासाठी पोलीस जंगजंग पछाडत आहेत.
चौकशीदरम्यान पोलिसांना सतत विसंगत उत्तरे देत बुचकळ्यात टाकणाऱ्या तरुणाने पोलिसांसमोर वारंवार स्टेटमेंट बदलली आहेत. तो मी नव्हेच ची भूमिका घेत आपल्याला स्वप्नच पडले नसल्याची कबुली पोलिसांना त्याने दिली होती. आपण स्वतः त्या ठिकाणी गेलो असे त्याने दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये सांगितले. यामुळे मृतदेह प्रकरणाचा गुंता वाढलेला असतानाच आता हा तरुण स्वतःच पळून गेला आहे. पोलिसांच्या सततच्या चौकशीमुळे हैराण झाल्यामुळे पळ तर काढला नाही ना असे बोलले जात आहे.
पोलीस मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी जंग जंग पछाडत आहेत. साऱ्या शक्यतांचाही पडताळा करण्यात येत आहे. मात्र अजूनही मृतदेहाची ओळखच न पटल्याने गूढ कायमच आहे. डीएनए चाचणी अहवालाकडेच पोलिसांचे लक्ष लागले असले तरी अजूनही प्रकरणाचा कसून तपास करण्यात पोलीस यंत्रणा गुंतल्या आहेत. अज्ञात व्यक्तीची आत्महत्या की हत्या याचा उलगडा करण्यासाठीही पोलीस यंत्रणा चौफर तपास करत आहेत.