मुंबई : सोमवारी नवी दिल्लीत भारताचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीदरम्यान एका वकिलाला फटकारले. याचिका माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या विरोधात चौकशीची मागणीची होती. कोर्टात याच सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्याशी बोलताना वकिलाने ‘या या’ असे म्हणत एका प्रश्नाला उत्तर दिले. सरन्यायाधीशांनी हेच उत्तर अधोरेखित केले आणि खडसावले की हे कोर्टरूम आहे कॉफी शॉप नाही. “असे ‘या, या, या’ म्हणू नका. ‘हो’ म्हणा हे कॉफी शॉप नाही, हे कोर्ट आहे. मला लोक ‘या, या’ म्हणणारे आवडत नाहीत,” असे चिडलेल्या सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी मत मांडले.
सर्वोच्च न्यायालय २०१८ मध्ये दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करत होते. ज्यामध्ये माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या विरोधात अंतर्गत चौकशीची मागणी करण्यात आली होती. सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी विचारले, “पण ही कलम ३२ अंतर्गत याचिका आहे का? न्यायाधीशाला प्रतिवादी बनवून तुम्ही जनहित याचिका कशी दाखल करू शकता?” प्रत्युत्तरात, याचिकाकर्त्याने म्हटले, “या-या… माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई… मला उपचारात्मक याचिका दाखल करण्यास सांगण्यात आले आहे…” याच प्रश्नाला उत्तर देताना याचिकाकर्ते यांनी या या शब्दांचा वापर केला होता.