संस्थेच्या कर्मचाऱ्याकडून तक्रार दाखल
रत्नागिरी/ विशेष प्रतिनिधी:-संगमेश्वर तालुक्यातील कोळंबे येथे एका शाळकरी मुलीशी गैरप्रकार दोन दिवसांपूर्वी समोर आला. या प्रकाराने खळबळ उडाली होती. शाळेतील एका कर्मचाऱ्याच्या हा प्रकार लक्षात आल्याने त्याने पोलिसात थेट ऑनलाईन तक्रार नोंदवली. त्यानुसार पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत शाळा व वसतीगृह चालविणारे संस्थेचे अध्यक्ष नयन मुळये (68, कोळंबे, संगमेश्वर), त्यांचा मुलगा प्रथमेश मुळये (36, कोळंबे) व मुख्याध्यापक संजय मुळये यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोळंबे येथील मुलींच्या वसतिगृहात मुलींसोबत किळसवाणा प्रकार घडला. वांद्री येथील शाळेत महिनाभरापूर्वी असा प्रकार घडला होता. संजय वामन मुळ्ये या शिक्षकाने ९ शाळकरी मुलींसोबत अश्लील वर्तन केले होते. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन कारवाई केली. त्यानंतर आता हा प्रकार कोळंबे येथे घडल्याने तालुका हादरला आहे.
जिल्हाधिकारी,जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी या प्रकरणात लक्ष घातले आहे. अशा घटना आता वाढीस लागल्याचे आवर घालण्यासाठी जिल्हास्तरावरून ठोस पावले उचलली जात आहेत.
कोळंबे येथे मागील 3 वर्षापासून हे मुलींची वसतिगृह सुरू आहे. अनेक ग्रामीण भागातील गरजू, गरीब मुलींना वाडी, पाड्यावरून शिक्षणासाठी याठिकाणी आणण्यात येत होत़े. या मुलींच्या वसतिगृहासाठी कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती.याठिकाणी शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन झाल्याचा प्रकार एका कर्मचाऱ्याच्या लक्षात आला.त्याने याबाबतची तक्रार ऑनलाईन पोलीस स्थानकात दाखल केली. प्रकरणाच्या तपासासाठी पोलीस या ठिकाणी दोन दिवस जाऊन तपास करत आहेत.एका ऑडिओमुळे हा प्रकार समोर आला अस सांगितलं जात आहे.
रत्नागिरी पोलिसात ऑनलाईन दाखल करण्यात झाल्यानंतर त्या दृष्टीने तपासाचा भाग म्हणून या संस्था चालकाची चौकशी करण्यात येत होती. पोलिसांनी गांभीर्याने यामध्ये लक्ष घालून तपास सुरू केला होता. पोलिसांनी मुलीचे जाब जबाब नोंदवून घेऊन आज संस्था चालक नयन मुळये,त्यांचा मुलगा प्रथमेश मुळये व मुख्याध्यापक संजय मुळये यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. अधिक तपास पोलीस करत आहेत.