मुंबई : अंगणवाडी सेविकांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करण्यात आल्याचा निर्णय आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतल्याची माहिती राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. तर ज्या सेविकांनी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरले त्यांना इन्सेंटिव्ह देखील मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
आदिती तटकरे म्हणाल्या की, आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत अंगणवाडी सेविकांच्या मानधन वाढीचा प्रस्ताव आम्ही ठेवला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर सर्व मंत्र्यांनी त्या प्रस्तावाला पाठिंबा दिला आहे. मानधनात साधारण 50 टक्के वाढ आम्ही केली आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
*अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ*
ज्या महिला मदतनीस आहेत त्यांना 3 हजार अधिक मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आला. तर अंगणवाडी सेविकांना दहा हजार रुपये मिळत होते. त्यात आता 5 हजार अधिक मिळणार आहेत. मागच्या वेळेस 3 हजार वाढवले होते. मात्र, आता पाच हजार वाढवण्यात आले आहेत, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे.
*इन्सेंटिव्ह देखील मिळणार*
त्या पुढे म्हणाल्या की, अतिशय परखडपणे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची मानधनात वाढ करण्यात आल्याने आम्हाला आनंद होत आहे. तर ज्या सेविकांनी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरले त्यांना इन्सेंटिव्ह देखील आम्ही सुरू करत आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमची अग्रेसर मागणी पूर्ण केली आहे.