समुद्रातील चाळ, खड्डे यांची माहिती घेण्याची गरज!
गणपतीपुळे / वैभव पवार :- रत्नागिरी तालुक्यातील जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ व प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथे येणाऱ्या पर्यटकांना येथील विलोभनीय समुद्रकिनारा भूरळ पाडतो आणि मग या विलोभनीय समुद्रात समुद्रस्नान केल्याशिवाय प्रत्येक पर्यटकांना मोह आवरताच येत नाही. त्यातूनच मग अनेक पर्यटक समुद्रात पोहण्यासाठी उतरतात. परंतु उतरलेल्या पर्यटकाला समुद्राच्या धोकादायक स्थिती विषयी माहिती नसते. समुद्रात पडलेले चाळ, खड्डे यांचा अंदाज येत नसतो. मात्र समुद्राच्या याच धोकादायक स्थितीविषयी जीव रक्षक व समुद्र चौपाटीवरील स्थानिक व्यावसायिकांकडून पर्यटकांना समुद्राच्या धोकादायक स्थितीविषयी वारंवार माहिती व सूचना दिल्या जातात. मात्र, या सर्वच सूचनांकडे दुर्लक्ष केले जाते तसेच बऱ्याच वेळेला पर्यटकांचा उद्धटपणा आणि बेजबाबदार देखील दिसून आला आहे. यातूनच पर्यटकांचा अति उत्साहीपणा आणि अतिरेक समुद्रात समुद्रस्नान करताना जीवावर बेतला आहे.
एकूणच गेल्या काही वर्षात गणपतीपुळे समुद्रात बुडणाऱ्यांचे प्रमाण कमी होण्यासाठी गणपतीपुळे ग्रामपंचायतचे जीवरक्षक व स्थानिक व्यवसायिकांचे विशेष सहकार्य लाभले आहे. आणि त्यानंतर गणपतीपुळे समुद्रकिनारी सुरू झालेल्या वॉटर स्पोर्टच्या माध्यमातून गणपतीपुळे समुद्रात बुडणार्यांचे प्रमाण सर्वाधिक कमी झाले परंतु पावसाळ्याचे चार महिने वॉटर स्पोर्ट व्यवसाय बंद असल्यानंतर गणपतीपुळे ग्रामपंचायतीचे जीवरक्षक ,गणपतीपुळे देवस्थानचे सुरक्षारक्षक आणि स्थानिक व्यावसायिकांनी आपली जबाबदारी ओळखून गणपतीपुळे समुद्रात पोहण्यासाठी उतरणाऱ्या पर्यटकांना सूचना देण्याचे काम नित्यनियमाने केले आहे. मात्र मात्र यंदाच्या पावसाळ्यात समुद्रात बुडून मृत्यू होण्याची दुसरी घटना घडली आहे. या घटनेनंतर पुन्हा एकदा पर्यटकांच्या अतिउत्साहीपणाचे आणि बेजबाबदारपणाचे कारण समुद्रातील दुर्घटनेला कारणीभूत ठरत असल्याचे मत स्थानिक व्यावसायिक आणि सर्वच स्थानिक ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.
येणाऱ्या सर्वच पर्यटकांनी स्थानिक जीवरक्षक, व्यवसायिक व ग्रामस्थ यांच्या सूचनांचे पालन करून समुद्रात पोहण्यासाठी उतरावे असे मत व्यक्त होत आहे त्याशिवाय समुद्र चौपाटीवरील वॉटरस्पोर्ट व्यावसायिकांच्या माध्यमातूनही पर्यटकांनी अधिक माहिती जाणून घेण्याची गरज असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.