लांजा:- लांजा शहरातील कोर्ले फाटा येथील रॉयल पार्क या बिल्डिंगमध्ये आज ही आज (२९ सप्टेंबर) रोजी चोरीची घटना घडली आहे.
सविस्तर वृत्त असे की,फ्लॅटच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने फ्लॅटमधील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण २ लाख ७१ हजार रुपयांच्या ऐवजावर डल्ला मारला आहे. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना आज रविवारी सकाळी १०.३० ते ११ या कालावधीत घडली आहे. शहरातील कोर्ले फाटा येथील रॉयल पार्क या निवासी इमारतीमध्ये ३०८ नंबरच्या फ्लॅटमध्ये रुहिदा हनीफ नेवरेकर (५३) यांचा तिसऱ्या मजल्यावर फ्लॅट आहे. रुहिदा या एकट्याच फ्लॅटमध्ये राहतात. आज रविवारी २९ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता त्या याच बिल्डिंगच्या पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या त्यांची जाऊ सहिदा आयुब नेवरेकर यांच्याकडे पाठीवर औषध मारण्यासाठी प्लॅट बंद करून कुलूप लावून गेल्या होत्या.
याच कालावधीत अज्ञात चोरट्याने त्यांच्या दरवाजाचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश करून बेडरूम मध्ये असलेले लाकडी कपाट चावीने उघडून आतील सोने चांदीच्या ऐवजावर डल्ला मारला. यामध्ये १ लाख २५ हजार रुपये किमतीचे २.५ तोळे वजनाचे सोन्याच्या बांगड्या, १२ ग्रॅम वाजण्याची आणि ५० हजार रुपये किमतीची सोन्याची चैन, पाच ग्रॅम वजनाचे आणि २५ हजार रुपये किमतीचे कानातील रिंग जोड, २५ हजार रुपये किमतीच्या पाच ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या कानातील टॉप जोडी, ३० हजार रुपये किमतीच्या दोन ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या तीन अंगठ्या, ४ हजार रुपये किमतीची एक तोळा वजनाची चांदीची चैन आणि १२ हजार रुपये किमतीची रोख रक्कम अशा एकूण २ लाख ७१ हजार रुपयांच्या ऐवजावर चोरट्याने डल्ला मारला.
याबाबतची तक्रार रुहिदा नेवरेकर (वय ५३) यांनी लांजा पोलिसांना दिली आहे. लांजा पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक देवकन्या मैदाड या करत आहेत .
दरम्यान दिवसाढवळ्या चोरीच्या घटनेने लांजा शहरात एकच खळबळ उडाली असून चोरट्याला पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले आहे. या चोरी प्रकरणी लांजा पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात भारतीय न्याय सहिता २०२३ चे कलम ३३१(३), ३०५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
या चोरीच्या घटने प्रकरणी रेम्बो या श्वान पक्षाला पाचारण करण्यात आले होते. या पथकासोबत हेड कॉन्स्टेबल भूषण राणे, वैभव आंब्रे, ठसे तज्ञांना देखील पाचारण करण्यात आले होते यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक रेपाळ, प्रथमेश क्षीरसागर आणि श्रीकांत दाभाडे ,स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे हेड कॉन्स्टेबल सुभाष भागणे, बाळू पालकर हे देखील उपस्थित होते.