चिपळूण : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत आयोजित मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 2 या अभियानातील खासगी शाळा विभागाचा निकाल नुकताच जिल्हा मूल्यांकन समितीने जाहीर केला आहे. त्यामध्ये सावर्डे येथील सह्याद्री शिक्षण संस्थेच्या गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने सलग दुसऱ्या वर्षी जिल्ह्यात प्रथम क्रमांक प्राप्त करण्याचा बहुमान पटकावला आहे.
संपूर्ण राज्यात 4 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर या कालावधीत हे अभियान राबवण्यात आले. या अभियानामध्ये विद्यालयाने उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून विद्यालयामध्ये आयोजित करण्यात आलेल्या शालेय व सहशालेय उपक्रमाचे सादरीकरण केले. पायाभूत सोयी सुविधा, शासन ध्येय-धोरण अंमलबजावणी, शैक्षणिक संपादन या मुद्यांची पीपीटी व पीडीएफ फाईलच्या माध्यमातून आणि प्रत्यक्ष शाळेची तपासणी केली. सुविचार, शालोपयोगी चार्टस्, प्रबोधनात्मक चित्रांनी लक्ष वेधून घेणाऱ्या संरक्षक भिंती, विद्यार्थ्यांनी शिक्षकाच्या मदतीने केलेली सुंदर वर्ग सजावट आणि आकर्षक शालेय इमारत, तसेच कलागुणांनी निपुण आणि बोलके विद्यार्थी या सर्वांची जिल्हास्तरीय मूल्यांकन समितीने विशेष दखल घेतली.
या अभियानात पहिल्या वर्षी विभागस्तरावर द्वितीय, दुसऱ्या वर्षी जिल्ह्यात प्रथम क्रमांक प्राप्त करून देदिप्यमान यश मिळवल्याने प्राचार्य राजेंद्र वारे, उपप्राचार्य विजय चव्हाण, पर्यवेक्षक उद्धव तोडकर, सर्व शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष व आमदार शेखर निकम, संचालक शांताराम खानविलकर, सचिव महेश महाडिक यांच्यासह पदाधिकाऱ्यानी विद्यालयाचे अभिनंदन केले.