रत्नागिरी : गावागावात जाऊन महिलांना सक्षम आणि आत्मनिर्भर करणाऱ्या उमेदच्याच कर्मचाऱ्यावर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शासनाने आम्हाला नियमित सेवेत घ्यावं आणि अभियान असच सुरू ठेवावं अशा मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत उमेदच्या महिलांचे बेमुदत आमरण उपोषण आणि आंदोलन शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू झाले. रखरखत्या उन्हाची तमा न बाळगता मोठ्या संख्येने महिला या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. तत्पूर्वी आपल्या मागण्यांसाठी त्यांनी जिल्हा परिषद ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जोरदार घोषणाबाजी केली. रत्नागिरी जिल्ह्यातील सुमारे 3 हजारपेक्षा जास्त महिला आणि कर्मचारी या आमरण उपोषण आणि आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.
उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याना शासनाने दिलेल्या आश्वासनाला तब्बल अडीच महिना होऊनही मागण्या मान्य न झाल्यामुळे उमेदच्या सर्व महिला, कार्यरत केडर, कंत्राटी अधिकारी व कर्मचारी यांनी आज जिल्हा परीषद रत्नागिरी येथे आपल्या मागण्यांचे निवेदन देवुन आंदोलनाला सुरुवात केली. पुढे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर हजारो महिलांनी घोषणा दिल्या इतनी शक्ती हमे दे ना दाता…ही प्रार्थना म्हणत सगळ्यांचे लक्ष वेधुन घेतले.
सध्या उमेदच्या माध्यमातून जिल्ह्यात 55 प्रभागसंघ कार्यरत आहेत. या प्रभांगांशी हजारो महिला जोडल्या गेलेल्या आहेत. विविध उद्योग आणि व्यवसायांसाठी कोट्यावधींचा निधी या महिलांकरीता वितरीत करण्यात आला आहे. त्यामुळे उमेद अभियान बंद झाल्यास या निधीचे व्यवस्थापन तसेच समुह, गामसंघ आणि प्रभागसंघ ही व्यवस्थाही कोलमडुन पडेल अनेक व्यवसाय मार्गदर्शना अभावी बंद पडतील त्यामुळे हे अभियान असेच सुरु ठेवावे. अभियानाला वेगळ्या विभागाचा दर्जा मिळावा आणि अभियानातील कर्मचाऱ्याना कायम करावे अशा मागण्या या आदोलनातून करण्यात आल्या आहेत.