चिपळूण:-येथील मुस्लिम समाज संस्थेने सामाजिक दृष्टिकोनातून हा जो बहुउद्देशीय प्रकल्प हाती घेतला आहे तो समाजासाठी आदर्शवत असाच आहे.येत्या दोन महिन्यात राज्यात आमची सत्ता येणार आहे.सत्ता येताच या प्रकल्पाला पूर्ण ताकद आम्ही देऊ आणि हा प्रकल्प मार्गी लावू अशी स्पष्ट ग्वाही राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री खा.शरद पवार यांनी दिली.प्रकल्पाला दिलेल्या भेटी दरम्यान त्यांनी हा शब्द पदाधिकाऱ्यांना दिला.
शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री खासदार शरद पवार रविवार व सोमवार या दोन दिवसीय दौऱ्यावर चिपळूणमध्ये आले होते.यावेळी त्यांनी आवर्जून येथील मुस्लिम समाज संस्था उभारत असलेल्या बहुउद्देशीय प्रकल्पाला भेट दिली.यावेळी माजी आमदार रमेश कदम,सरचिटणीस प्रशांत यादव,माजी मंत्री बाळाराम पाटील,बबन कणावजे आदी नेते त्यांच्या बरोबर होते.तर चिपळूण मुस्लिम समाज संस्थेचे अध्यक्ष सलिम कासकर,कार्याध्यक्ष नाझीम अफवारे,विश्वस्त शौकत मुकादम,इब्राहिम दलवाई,यासिन दळवी,सामाजिक कार्यकर्ते अमीन परकार,लियाकत खतीब,इम्तियाज मुकादम,बशीर फकीर,महंमद फकीर,इनायत मुकादम,कादिर मुकादम तसेच सर्व कार्यकारणी सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते. संस्थेच्या वतीने सर्वप्रथम शरद पवार यांचा व उपस्थितांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी चिपळूण मुस्लिम समाज संस्थेच्या वतीने खा.शरद पवार यांना कुराण ची प्रत ही भेट देण्यात आली.खा.शरद पवार यांनी स्वतः पायी फिरून या प्रकल्प उभारणीची पाहणी केली तसेच या प्रकल्पाबाबत इत्यंभूत माहिती देखील जाणून घेतली.सुमारे ८ कोटीहून अधिक खर्चाचा हा मोठा प्रकल्प असून कम्युनिटी हॉलसह अनेक सोयीसुविधा येथे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.एक प्रकारे हा बहुउद्देशीय महत्वकांक्षी प्रकल्प असून त्याचे काम आता सुरू आहे.संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात एकमेव ठरावा असा हा प्रकल्प येथील मुस्लिम समाज संस्थेने हाती घेतला आहे त्याचे कौतुक खा.शरद पवार यांनी केले.
यावेळी ते म्हणाले समाजासाठी आशा वास्तू उभ्या रहाणे ही काळाची गरज आहे.समाजाचे हित लक्षात घेऊन या संस्थेने जे धाडस केले आहे त्याला माझ्या शुभेच्छा आहेत.हा एक आदर्शवत प्रकल्प ठरेल आणि येथून समाजातील दिन दुबळ्यांची,कष्टकऱ्यांची सेवा होईल, त्यामुळे या प्रकल्पाचे काम थांबता कामा नये ते अविरत सुरू रहावे आणि लवकरात लवकर हा प्रकल्प पूर्ण होऊन समाजाला लोकार्पण व्हावा आशा प्रकारच्या सदिच्छा देखील त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.
पुढे खा.शरद पवारांनी मोठी घोषणा केली.ते म्हणाले राज्यातील जनतेला आमची भूमिका पटलेली आहे.आम्हला साथ देण्याची जनतेची मानसिकता तयार झालेली आहे.त्यामुळे आगामी दोन महिन्यात महाराष्ट्रात आमची सत्ता येणार आहे.आमची सत्ता येताच या बहुउद्देशीय प्रकल्पाला पूर्ण ताकद दिली जाईल.असा स्पष्ट ग्वाही त्यांनी यावेळी मुस्लिम समाज संस्थेला दिली.कोणतीही अडचण किंवा समस्या असेल तर कधीही माझ्याकडे या सर्व ते प्रयत्न आमच्याकडून केले जातील असे आश्वासन देखील त्यांनी यावेळी दिले.