राजापूर/तुषार पाचलकर:-मुंबई-गोवा महामार्गावर राजापूर शहरापासून पुढे उन्हाळे येथे घालण्यात आलेले स्पीडब्रेकर अपघातांना आमंत्रण देत आहेत. राजापूर एसटी डेपोपासून लगतच असलेल्या बावकर हॉस्पिटलसमोरील स्पीडब्रेकरमुळे सोमवारी एका कंटेनरचा अपघात झाला. त्यामुळे महामार्गावर घालण्यात आलेल्या स्पीडब्रेकरचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
राजापूर तालुक्यातून गेलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे बहुतांश काम पूर्ण झाले आहे.चौपदरीकरणाचे काम सुरू असताना काही ठिकाणी एकेरी वाहतूक सुरू होती. त्यामुळे अपघाताची शक्यता असल्याने स्पीडब्रेकर घालण्यात आले होते. काम पूर्ण झाल्यानंतर हे स्पीडब्रेकर काढणे आवश्यक होते. धोकादायक व अपघातग्रस्त ठिकाणे वगळून अन्य ठिकाणचे स्पीडब्रेकर तरी हटवणे गरजेचे होते. मात्र आता महामार्गाचे बहुतांश काम पूर्ण होऊन अपवाद वगळता दोन्ही बाजूने वाहतूक सुरू असतानाही शहरापासून ते उन्हाळे गंगातीर्थ तिठ्यापर्यंत जागोजागी स्पीडब्रेकर तसेच ठेवण्यात आले आहेत.
मुळात हे स्पीडब्रेकर आवश्यकतेपक्षा अधिक उंचीचे आहेत. त्यातही स्पीडब्रेकर वाहनचालकांच्या निदर्शनास यावेत, यासाठी त्यावर साधे पांढरे पट्टे मारण्याची तसदीही संबंधित ठेकेदार कंपनी घेत नाही. शिवाय सूचनाफलक लावण्यात आलेला नाही. त्यामुळे महामार्गावरून वेगाने येणारी वाहने स्पीडब्रेकर दिसत नसल्याने स्पीडब्रेकरवर आदळून पुढे जात आहेत.