रायगड : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे अध्यक्ष म्हणून माजी आमदार आणि खासदार सुनिल तटकरे यांचे विश्वासू बॅ. अंतुले यांचे वैचारिक वारसदार मुस्लिम समाजातील नेते मुश्ताक अंतुले यांची मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्यासह त्यांना नियुक्ती पत्र दिले. महायुती सरकारने कोकणातील एका प्रमुख मुस्लिम चेहऱ्याला या महामंडळात काम करण्याची संधी दिल्याने समाज बांधवांतून समाधान व्यक्त होत आहे.
लोकसभा निवडणुकीत मुश्ताक अंतुले यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिट्टी देऊन खासदार सुनील तटकरे यांच्या खंबीर नेतृत्वावर विश्वास ठेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला होता. या दरम्यान मुश्ताक अंतुले यांना महायुती सरकारमधील महामंडळात काम करण्याची संधी दिली जाईल असे वचन खासदार सुनिल तटकरे यांनी दिले होते. उपमुख्यमंत्री अजीत पवार यांची खा. सुनील तटकरे यांनी भेट घेऊन मुश्ताक भाईं अंतुले यांच्या नावाची शिफारस केली. ना. अजीत पवार यांच्या समवेत महायुतीतील सर्व नेते गणांनी अंतुले यांच्यावर विश्वास दाखवत त्यांची मौलाना आझाद अल्पसंख्याक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड केली.
काल त्यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला आहे. मुश्ताक अंतुले यांना समाजाची सेवा करण्याची संधी मिळाल्याने ते माजी मुख्यमंत्री स्व.बॅ.ए. आर.अंतुले साहेबांच्या पाऊलांवर पाऊल ठेऊन नक्कीच अल्पसंख्याक समाजातील प्रलंबीत प्रश्न मार्गी लावतील असा विश्वास अल्पसंख्याक समाज बांधवांनी व्यक्त केला आहे. मुश्ताक अंतुले यांच्या निवडी बद्दल उप मुख्यमंत्री अजीत पवार, खा. सुनिल तटकरे, महिला बाल विकास मंत्री अदिती तटकरे, माजी आम.अनिकेत तटकरे आदी प्रमुख नेते मंडळी व असंख्य मुस्लिम समाज बांधवांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.