लांजा:-लांजा तालुक्यातील सापुचेतळे येथे वडापावच्या गाडीवर बेशुद्धावस्थेत आढळलेल्या 33 वर्षीय तरूणाच्या मृत्यूबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. त्याच्या अंगावर जखमा असल्याने त्याचा घातपात किंवा खून झाला असल्याचा संशय व्यक्त होत होता. त्याच्या नातेवाईकांनी जरी खून झाल्याचा संशय व्यक्त केला असला तरी पोलिसांनी मात्र हा खून नसल्याचे म्हटले आहे. त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त होत आहे. तो लांजा येथील सापूचेतळे येथे वडापाव व्यवसाय करत असला तरी तो भाग पूर्णगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याने पूर्णगड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे की, लांजा तालुक्यातील सापुचेतळे येथे संदीप नारायण फटकरे (33, रा.चांदोर, रत्नागिरी) हा तरुण सोमवारी रात्री बेशुद्धावस्थेत आढळून आला होता. त्याला उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालय येथे दाखल करण्यात आले होते. मात्र मंगळवारी सकाळी 11 वाजता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
संदीप हा मागील काही वर्षापासून सापुचेतळे लांजा येथे आपल्या आई-वडिलांसह वडापावचा व्यवसाय करत होत़ा. सोमवार 23 सप्टेंबर रोजी रात्री उशिरा तो वडापावची टपरी बंद करून घरी जाण्यासाठी निघाला होता. मात्र उशिरापर्यंत घरी न आल्यामुळे घरच्यांनी शोध घेतला असता. तो तेथेच बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. कुटुंबीयांनी संदीपला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र मंगळवारी सकाळी संदीपचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मंगळवारी रात्री उशिरा संदीप याचे जिल्हा शासकीय रुग्णालय येथे शवविच्छेदन करण्यात आले. संदीप याच्या बेशुद्ध होण्याचे व त्यातून मृत्यू होण्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त होत आहे. या प्रकरणी पूर्णगड पोलिसांनी संदीप याच्या मृत्यूप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. तसेच संदीप याचे मित्रपरिवार व नातेवाईकांची चौकशी पोलिसांकडून करण्यात येत आहे. शवविच्छेदन अहवालानंतर संदीप याच्या मृत्यूचे नेमके कारण समोर येईल अशी माहिती पोलिसांनी दिली.