रत्नागिरी:-रत्नागिरीतील चंपक मैदान येथे परीचरिकेवर अत्याचार झाल्याच्या घटनेने जिल्ह्यासह राज्यभर पडसाद उमटले होते. आक्रमक जमावाला पोलिसांनी शांत करत या प्रकरणाचा लवकरच छडा लावू असे सांगितले होते. त्यानंतर जवळपास महिन्याचा कालावधी लोटला तरी याबाबत पोलिसांनी माहिती दिली नाही. याकडे साऱ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. मात्र आता या प्रकरणाचा तपास अंतिम टप्प्यात पोहोचला असून लवकर सत्य सर्वांसमोर येणार आहे असे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान येत्या आठवडाभरात या प्रकरणी फॉरेन्सिक लॅबचा अहवाल येताच सत्त्य समोर ठेवले जाईल, असे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.
चंपक मैदानावरील त्या अत्याचार प्रकरणाला सुमारे एक महिना होत आला आहे. हा प्रकार पुढे आल्यानंतर रत्नागिरीत तीव्र नाराजी व्यक्त केली जात होती. मुलींच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. पोलिसांनी पीडित मुलीचा जबाब न्यायालयासमोर नोंदवण्यासाठीची मागणी केली होती. त्यानुसार तपास सुरू होता. राज्यभरात होत असलेल्या अत्याचार प्रकरणांमुळे या प्रकाराबाबत लवकरात लवकर उलगडा होणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे मत होते. मात्र या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली आहे. ही घटना गंभीर असल्यामुळे सगळ्या बाजूंचा विचार करणे आवश्यक आहे. या घटनेत धागाधागा जोडून पोलिसांनी सखोल तपास केला आहे. या विषयीचा तपास आता पूर्ण होत आला आहे. फॉरेन्सिक लॅबचा अहवालानंतर पोलीस या बाबत सविस्तर माहिती लवकरच जाहीर करतील, असे सांगण्यात आले.