जिल्ह्यातील तब्बल 4 लाख महिलांना मिळणार लाभ
रत्नागिरी:-मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचा तिसरा हप्ता 29 सप्टेंबर रोजी संबंधित महिलाच्या बँक खात्यात जमा होणार आहे. जिल्ह्यातील तब्बल 4 लाख 5 हजार 840 महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. तसेच या योजनेचा लाभ मिळण्यासाठी महिलांनी आपले आधार आपल्या बँक खात्याशी संलग्न असल्याची खात्री करुन घेण्याचे आवाहन महिला आणि बालविकास विभागाकडून करण्यात आली आहे.
1 जुलैपासून जाहीर झालेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी जिल्ह्यातील पात्र महिलांपर्यंत पोहोचण्यासाठी जिल्हा महिला आणि बालविकास विभागाकडून शर्थीचे पयत्न केले जात आहेत. सर्व गावे तसेच शहरांमधील अंगणवाडीसेविका यासाठी दिवस-रात्र मेहनत घेत आहेत. जुलै ते ऑगस्ट या 2 महिन्यात जिल्ह्यातील 2 लाख 70 हजार 722 महिलांना या योजनेचा लाभ मिळाला. अनेकांच्या बॅंक खात्यात जुलै व ऑगस्ट महिन्याचे मिळून 3 हजार रुपये जमा झाले. आता पुढे 30 सप्टेंबरपर्यंत अर्ज भरण्याची मुदत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे अजूनही अनेक महिला या योजनेसाठी अर्ज भरत आहेत. आता या योजनेसाठी सुरु करण्यात आलेला नारीशक्ती दूत हा ऍप बंद करुन उपलब्ध पोर्टलवर अर्ज भरले जात आहेत. त्यामुळे गावातील ई-सेवा केंद्रात तसेच शहरांमधील सायबर कॅफेत अर्ज भरण्यासाठी गर्दी होत आहे. 1 ते 20 सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यातील 4 लाख 5 हजार 840 महिलांनी अर्ज दाखल केले. यापैकी 3 लाख 96 हजार 208 महिलांच्या अर्जाला तालुकास्तरानंतर आता जिल्हास्तरावर मंजुरी मिळाली. त्यामुळे आता या सर्व महिलांच्या बँक खात्यात रक्कम जमा होणार आहे. मात्र काही महिलांनी अद्याप आपल्या बँक खात्याशी आधार जोडणी केलेली नसल्यास अशा महिला मात्र या लाभापासून वंचित राहणार आहेत.