तुषार पाचलकर / राजापूर
तालुक्यातील पाचल येथील डॉ. प्राची राजाराम जाधव यांची यांनी नुकतीच फिजिओलॉजीमध्ये एम डी. करत पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. डॉ. प्राची जाधव यांनी या वैद्यकीय क्षेत्रातील पदवी प्राप्त करून आई वडिलांची आणि पाचल परिसरातील नागरिकांची मान अभिमानाने उंचावली आहे. सध्या त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
डॉ. प्राची यांनी जिल्हा परिषदेच्या पाचल शाळा नं. 1 मधून प्राथमिक शिक्षण घेतलं. त्यानंतर सरस्वती विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय पाचल येथे माध्यमिक व उच्च शिक्षण घेतले. त्यांना रुग्णांचे होणारे हाल आणि यातना पहावत नव्हत्या. यासाठी त्यांनी आपण डॉक्टर पेशाकडे वळले पाहिजे असा मनोमन विचार करुन त्याकडे लक्ष केंद्रीत केले. यानंतर त्यांनी शासकीय कोट्यातून प्रवेश मिळवून भाईसाहेब सावंत आयुर्वेद कॉलेज, सावंतवाडी येथून 2018-19 साली बी.ए.एम. एस. शिक्षण घेतले.
कोरोना काळात त्यांनी रुग्णांची सेवा केली. जिल्हा शासकीय रुग्णालय रत्नागिरी येथे त्यांनी आपले कर्तव्य बजावले. यावेळी त्यांनी अनेक रुग्णांना मानसिक आधार दिला. त्यानंतर त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र, करक-कारवली व भांबेड लांजा येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून कामकाज पाहिले. वर्षभरानंतर त्यांना आणखी शिक्षणाची ओढ स्वस्त बसू देत नव्हती. त्यांनी पीजी -नीट परीक्षेत उत्तीर्ण होऊन शासकीय कोट्यातून येरला मेडिकल कॉलेज खारघर नवी मुंबई येथून फिजिओलॉजीमध्ये एमडी विषयात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. त्यांच्या या पदवीने पाचल परिसरात अभिनंदन होत आहे. सद्या त्यांनी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सेवा देण्याचा मानस व्यक्त केला आहे.
*रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा : प्राची जाधव*
आपल्या वैद्यकीय क्षेत्रातून सर्वसामान्य कुटुंबातील रुग्णांना अत्यंत उत्तम आणि अत्यल्प दरात सेवा देण्याचा पयत्न करणार आहे, तसेच रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा मानून लोकांची सेवा करायला आवडेल असे त्यांनी सांगितले.