गुहागर : गुहागर आगारातून पुणे येथे बस घेऊन जाणाऱ्या चालक वाहकाला तिघांनी खेड, शिवापूर टोलनाक्यावर जबर मारहाण झाल्याची घटना गुरूवार 19 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास घडली. बस चालक प्रविण भगवान नांगरे (34), वाहक एस. एन. कल्लुरकर अशी जखमी झालेल्या दोघांची नावे आहेत.
सविस्तर वृत्त असे की, गुहागर आगारातून 19 सप्टेंबर रोजी सकाळी 9.15 वाजता गुहागर स्वारगेट ही बस चालक प्रविण नांगरे व वाहक कल्लुरकर घेऊन जात होते. या बसमध्ये 45 प्रवाशी प्रवास करत होते. बस चिपळूण, पाटण, उंब्रज, सातारामार्गे पुणे असा प्रवास करत असताना खेड शिवापूर गावाच्या हद्दीतील टोलनाक्याजवळ आली असता एका ट्रकने कट मारला. ट्रक हा टोल पास करून पुढे वजन काटयावर थांबला असता चालक प्रविण नांगरे यांनी ट्रकचालकाला याचा जाब विचारला. बसमध्ये प्रवासी असून त्यांना कमी जास्त झाल्यास कोण जबाबदार, असे विचारले असता टोल नाक्यावरील निळा टी शर्ट घातलेल्या मुलगा पुढे येऊन तु तरी कुठे एस. टी. निट चालवतो. असे म्हणून शिवीगाळ, दमदाटी करून हाताने मारहाण सुरू केली. या एस. टी. ड्रायव्हरांना लय माज असतो. असे म्हणून शिवीगाळ करीत आपले नाव विशाल जाधव असे त्याने सांगितले. त्याच्या बरोबर आणखी दोन व्यक्तींनी चालक नांगरे यांना जबर मारहाण सुरू केली. यावेळी वाहकालाही मारहाण केली. या मारहाणीमध्ये चालकाच्या पायाला, बरगडीला जबर मार बसला. तोंडातून रक्त वाहत होते. अशा अवस्थेत प्रसंगावधान राखून वाहकाने बस चालवत स्वारगेटपर्यंत आणली. त्यानंतर चालक नांगरे व वाहक कल्लुरकर या दोघांवर तेथील रूग्णालयामध्ये उपचार करण्यात आले. रात्री उशीरा तेथील राजगड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. याप्रकरणी संशयित विशाल जाधव व अन्य दोघांवर भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत 132, 121(1), 118(1), 115(2), 352, 351(2), 351(3), 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चालक प्रविण नांगरे यांना उपचार करून घर पाठवण्यात आले आहे, तर वाहक कल्लुरकर हे उपचार घेऊन गुहागर आगारात सेवेवर हजर झाले.