रत्नागिरी रेल्वे स्टेशन समोरील रस्त्यावर कारवाई
रत्नागिरी:-रत्नागिरी शहर पोलिसांनी रेल्वे परिसरात शुक्रवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास मोठी कारवाई करत दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 1 लाख 25 हजार 700 रुपयांच्या ब्राऊन हेरॉईनसह मुद्देमाल जप्त करण्यात आला. मुहाफीज यासीन सोलकर ( 30, रा. कर्ला), व फुरकान पाशा जागीरदार (28, रा. कर्ला) अशी संशयित दोघांची नावे आहेत.
सविस्तर वृत्त असे की, हे दोघे रत्नागिरी रेल्वे सबस्टेशनच्या रस्त्यावर ब्राऊन हेरॉईन विकणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. शुक्रवारी रात्री पोलिसांनी या ठिकाणी दोघांची चौकशी केली. त्यावेळी त्यांच्याकडे 13.00 ग्रॅम वजनाचे ब्राउन हेरॉईन व 112.5 ग्रॅम वजनाचा गांजा अंमली सदृश्य पदार्थ आढळून आला. प्लास्टीक पाउचमध्ये 350 कागदी पुड्यांमधील खाकी रंगाची ब्राउन हेरॉईन उग्रवासाचा अंमली सदृश्य पदार्थ होता. त्याची किंमत 1 लाख 22 हजार 500 रुपये तर 3 हजार रुपये किंमतीची 15 पारदर्शक प्लास्टीक पिशव्या, त्यामध्ये हिरव्या काळ्या रंगा उग्र वासा पाला, फुले, काड्या, बोंडे असलेला गांजा अंमली सदृश्य पदार्थ होता. त्याचबरोबर 200 रुपये किंमती चॉकलेटी रंगाची सॅक बॅग जुनी मिळून आली. हा सर्व मुद्देमाल दोन पंचासमक्ष पोलीस निरीक्षक महेश तोरसकर यांनी जप्त करून तो सिलबंद केला.
ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक शाम आरमाळकर, पोलीस कॉन्स्टेबल अमित पालवे, पोलीस हवालदार आशिष भालेकर, राहुल जाधव यांनी केली.