लांजा : तालुक्यातील काही गावांमध्ये कोळसुंद्याचे (रानकुत्रे) अस्तित्व दिसू लागल्याने रानडुक्कर याच्या पासुन भात शेतीचे होणारे नुकसानाचे प्रमाण कमी झाले आहे. शेतकऱ्यांसाठी ही दिलासा देणारी बाब असून आता गवा रेडे यांच्यानंतर रानकुत्रे यांचा संचार लांजा तालुक्यात आढळून आला आहे.
तळवडे, येरवंडे, आसगे आदी गावात रानकुत्रे दिसून येत आहेत. यामुळे शेतीचे नुकसान करणारे माकड, रानडुक्कर याचे प्रमाण कमी असल्याचे येथील शेतकरी यांनी सांगितले. लांजा वनपाल श्री फकीर यांना संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की कोळसुंदे म्हणजे रानकुत्रा. कोळशिंदे, कोळसुंदे, कोळीसनं, कोळसून, सोनकुत्रा अशा बर्याचशा स्थानिक नावांनी ओळखला जाणारा, कळपाने राहणारा हा मांसभक्षी जंगली कुत्रा. सह्याद्रीच्या घनदाट अरण्यामध्ये याचा वावर असतो. रानकुत्र्यांच्या अस्तित्त्वाबाबत वनविभाग सतर्क झाले आहे. कोकणात शेतीला नुकसानदायी ठरणार्या तृणभक्षी प्राण्यांची संख्या वाढत आहे. याच वाढत्या संख्येवर नैसर्गिकरित्या नियंत्रण ठेवण्यासाठी रानकुत्र्यांची संख्यादेखील वाढणे आवश्यक असल्याचे मत वन्यजीव संशोधक मंडळी मांडत आहेत.
गेल्या दहा वर्षांमध्ये सह्याद्रीतील संरक्षित वनक्षेत्रामधील रानकुत्र्यांच्या अधिवासाच्या क्षेत्रात वाढ झाल्याचे अभ्यासाअंती समोर आले आहे. वनविभाग आणि वाईल्डलाईफ कॉन्झर्वेशन ट्रस्टने (डब्ल्यूसीटी) सह्याद्री-कोकण वन्यजीव भ्रमण मार्गातील रानकुत्र्यांच्या अधिवास क्षेत्राचा अभ्यास केला. या अभ्यासामध्ये वन्यजीव संशोधक गिरीश पंजाबी यांना कर्नाटकातील पश्चिम घाटाच्या भागांमध्ये रानकुत्र्यांचे अधिवास क्षेत्र कमी झाल्याचे निदर्शनास आले. उलटपक्षी महाराष्ट्रात रानकुत्र्यांच्या अधिवास क्षेत्राचा विस्तार झालेला दिसला. महाराष्ट्रातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्प ते तिलारीपर्यंत रानकुत्र्यांच्या अधिवासाचा विस्तार २०१०-११ साली ६५ टक्के होता. ज्यामध्ये २०१९-२० साली वाढ होऊन ही टक्केवारी ८१ टक्क्यांवर गेली. अशा पद्धतीने संरक्षित वनक्षेत्रा बरोबरच रानकुत्र्यांच्या अधिवासाचा विस्तार हा सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या गावांमध्येदेखील वाढत गेलेला दिसतो. सह्याद्री पर्वतरांगेच्या पायथ्याशी वसलेल्या गावांमध्ये रानकुत्र्यांचे अस्तित्व हे पूर्वीपासूनच आहे. त्यामुळे इथल्या शिकार्यांमध्ये या प्राण्याविषयी बरेच गैरसमज आहेत.
संगमेश्वर तालुक्यातील श्रुंगारपूरसारख्या सह्याद्रीच्या पायथ्याला वसलेल्या गावांमध्ये पूर्वीपासूनच रानकुत्र्यांचे अस्तित्व आहे. मात्र, गेल्या काही वर्षात लांजा, देवरुख आणि त्याच्या आजूबाजूच्या गावांमध्ये रानकुत्र्यांनी निर्माण केलेला कायमस्वरूपी अधिवास हा अभ्यासाचा विषय बनला आहे.