लांजा : लांजा पोलीस ठाणेच्या गणपती बाप्पाला अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी बुधवारी १८ सप्टेंबर रोजी रात्री भावपूर्ण वातावरणात आणि जड अंत:करणाने निरोप देण्यात आला. सायंकाळी ५ वाजता पोलीस ठाणे येथून गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली.
लांजा शहरातील मुख्य बाजारपेठेतून ही विसर्जन मिरवणुक काढण्यात आली. यावेळी फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण, बेंजोच्या तालावर थिरकत आणि गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या… अशी आर्त विनवणी करता लांजा पोलिसांनी आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला शहरानजीकच्या बेनी नदी येथे रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास निरोप दिला.
गणेशोत्सवात प्रत्येक जण बाप्पाच्या आगमनाकडे डोळे लावून असतात. मात्र पोलीसांच्या बाबतीत ही स्थिती नेमकी उलटी असते. याच कालावधीत गर्दीवर नियंत्रण ठेवणे, कोणतीही गंभीर घटना घडू नये यासाठी करावा लागणारा बंदोबस्त यामुळे पोलिसांना मात्र आपल्या घरी विघ्नहर्ता आलेला असतानाही त्यांची सेवा करावयास मिळत नाही. अशी खंत मनातून बोचत असते. ही बाब लक्षात घेऊन त्यांनाही गणेशोत्सवाचा आनंद घेता यावा यासाठी गेल्या २९ वर्षांपासून लांजा पोलीस ठाण्याच्या आवारातील महापुरुष मंदिरात बाप्पांची प्रतिष्ठापना केली जात आहे. कामाच्या व्यापातून थोडासा वेळ बाजूला काढून पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी या विघ्नहर्त्याच्या सेवेत लीन होत असतात.
अगदी या बाप्पाचे आगमन होण्याअगोदर मखर, आकर्षक विद्युत रोषणाई आदी कामांमध्ये सर्व पोलीस कर्मचारी मोठ्या तन्मयतेने आणि भक्तिभावाने सहभागी होतात. बाप्पांचे आगमन झाल्यानंतर दररोज सकाळी आणि संध्याकाळी होणारी पूजा, आरती यातही प्रत्येक पोलीस कर्मचारी मनापासून सहभागी होत असतात.
अशा दहा दिवसांच्या भक्तीमय वातावरणानंतर लांजा पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे आणि इतर कर्मचाऱ्यांनी आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला बुधवारी रात्री अतिशय जड अंत:करणाने निरोप दिला.