राजापूर:- येथे गेल्या महिन्यात घरफोडी करणाऱ्या चौघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे.
रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी रत्नागिरी जिल्ह्यात नजीकच्या काळात घडलेल्या घरफोड्या-चोऱ्यांचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या दृष्टीने विशेष मोहीम राबविण्याच्या सूचना दिल्या होत्या.
त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे नूतन पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांनी जिल्ह्यातील गुन्ह्यांचा आढावा घेतला आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेमधील पोलीस अधिकारी आणि अंमलदारांची विशेष पथके तयार करण्यात आली.
त्याच दरम्यान गेल्या २० ऑगस्ट रोजी रात्री नाटे बाजारपेठेतील झैद मोबाईल व इलेक्ट्रॉनिक्स या दुकानाचे शटर कोणत्या तरी हत्याराने उचकटून आत प्रवेश करून चोरट्यांनी दुकानातून ४९ मोबाइल हॅण्डसेट, टॅब आणि अन्य साहित्य असा सहा लाघ ८३ हजार ७०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरला होता. दुकानाचे मालक नासिर इब्राहिम काझी (रा. जैतापूर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून याबाबत नाटे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून समांतर तपास चालू असताना गोपनीय माहितीच्या आधारे तसेच नाटे परिसरातील कंत्राटी बांधकाम करणाऱ्या काही जणांकडे केलेल्या चौकशीमध्ये या गुन्ह्यातील आरोपी कर्नाटक राज्यात तसेच मुंबईत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक ढेरे यांनी त्वरित दोन पथके तयार करून कर्नाटक राज्य आणि मुंबईत पाठविली. या पथकांकडून त्थे तपास चालू असताना कर्नाटकात एका तपास पथकाने करण हाज्याप्पा पुजारी (वय २६ वर्षे, बाजनगर, सुबानाईक तांडा, नलवार, ता. चितापूर, जि. गुलबर्गा, रा. कर्नाटक), राहूल रेड्डी चव्हाण (२४, रा. बलराम चौक, तलाई तांडा, जि. चितापूर, जि. गुलबर्गा) यांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले. मुंबईला गेलेल्या तपास पथकाने प्रेम सपन कर्माकर (२२, मोतीला नगर, नंबर १ रोड, गोरेगाव वेस्ट, दत्त मंदिराजवळ, रूम नं. ५०४, मुंबई) याचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून मिळालेल्या अधिक माहितीच्या आधारे सबन्ना भिमराय कोबळा (२४ वर्षे, नलवार, ता. चितापूर, जि. गुलबर्गा) यास नाटे पोलीस ठाण्याच्या हद्दीमधून ताब्यात घेण्यात आले आहे.
या चारही आरोपींकडून गुन्ह्यात चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी चार लाख १३ हजार १७७ रुपये किमतीचे ३३ मोबाइल हॅण्डसेट आणि १ टॅब असे साहित्य जप्त करण्यात आले. या गुन्ह्याचा अधिक तपास चालू आहे.