रत्नागिरी:-सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टतर्फे येत्या २६ आणि २७ सप्टेंबर रोजी सहाशेहून अधिक मराठी उद्योजकांचा मेळावा रत्नागिरीत आयोजित करण्यात आला आहे. कोकणचा गौरवशाली अभियांत्रिकी वारसा सांगणारा इंजिनियर्स डे सेंटर्ड क्लबतर्फे आयोजित करण्यात आला आहे.पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.
सर विश्वेश्वरय्या यांचा जन्मदिवस हा इंजिनियर्स डे म्हणून साजरा केला जातो. हेच औचित्य साधून मराठी उद्योजकांसाठी कार्य करणाऱ्या सॅटर्डे क्लबने ‘इंजिनिअर डे’ आणि प्रदर्शन आयोजित केले आहे. प्रदर्शनासाठी महाराष्ट्र, गोवा, गुजरात आणि इंदूरमधून व्यावसायिक येणार आहेत. विशेष म्हणजे मराठी उद्योजकांसाठी सॅटर्डे क्लब संस्था स्थापन करणारे माधवराव भिडेसुद्धा ब्रिज इंजिनिअर म्हणून प्रसिद्ध होते. मेळाव्याच्या निमित्ताने त्यांना आगळवेगळी श्रद्धांजलीही वाहण्यात येणार आहे. सॅटर्डे क्लबच्या देशभरात ११० शाखा असून प्रत्येक विभागात साधारण २० ते २५ कोटीची उलाढाल दर महिन्याला होते.
अभियांत्रिकीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. कोकणालादेखील असामान्य अभियंते लाभले आहेत. हेच लक्षात घेऊन यावर्षी सेंटर्डे क्लबने कोकणचा गौरवशाली अभियांत्रिकी वारसा ही संकल्पना घेऊन इंजिनियर्स डे आणि प्रदर्शन आयोजित केले आहे. हा कार्यक्रम स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात होणार आहे. मेळाव्याचे उद्घाटन २६ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता सेंटर्डे क्लबचे व्यवस्थापकीय संचालक अशोकजी दुगाडे, सेक्रेटरी जनरल सुहास फडणीस आणि डेप्युटी सेक्रेटरी जनरल केदार साखरे तसेच इतर मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.
कार्यक्रमात महाराष्ट्रातील पहिली ड्राय डॉक उभारणारे रत्नागिरीचे मरीनर दिलीप भाटकर अभियांत्रिकी आणि उद्योजकता या विषयावर, कॉनबॅकचे संचालक आणि ब्रेन बिहाइंड बांबू अशी ख्याती असलेले कुडाळचे बांबू तज्ज्ञ संजीव कर्पे सर सस्टेनेबल मॉर्डन आर्किटेक्चर या विषयावर मार्गदर्शन करतील. कोकण रेल्वेच्या करबुडे बोगद्याची निर्मिती आणि जगातील काश्मीरमधील सर्वांत उंच चिनाब रेल्वे पूल निर्मितीसाठी योगदान असलेले कोकण रेल्वेचे चीफ इंजिनियर रवींद्र पाटील कोकण रेल्वेतील भविष्यातील संधी या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.
राजापूर येथील ऑर्गन वाद्यनिर्मितीचे पेटंट मिळवलेले उमाशंकर ऊर्फ बाळ दाते आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून सुमारे ४०० वर्षांहून अधिक नौकाबांधणीचा व्यवसाय करणाऱ्या आजच्या काळाचे प्रतिनिधी संजय वाडकर यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. कार्यक्रमास उद्योगमंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत, त्यांचे बंधू महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि रत्नसिंधू समृद्ध योजना समितीचे सदस्य किरण सामंत उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमासाठी क्लबच्या १०० हून अधिक शाखांमधून देशभरातून ६०० पेक्षा अधिक सदस्य उद्योजक उपस्थित राहणार आहेत. इंजिनिअरिंग कॉलेजचे विद्यार्थी, इंजिनियर्स आणि इंजिनियरिंग कंपन्यांचे मालक तसेच नागरिकांनीदेखील उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
दोन्ही दिवशी महा एक्सपो अर्थात महाराष्ट्रातल्या विविध उद्योजकांच्या व्यवसायांचे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. प्रदर्शनाची सुरुवात २६ तारखेला सकाळी दहा वाजल्यापासून करण्यात येईल. दुसऱ्या दिवशी, २७ तारखेला सकाळी नऊ वाजल्यापासून सेंटर्डे क्लबच्या वॅबसाइट च्या आणि इतर सदस्यांसाठी नेटवर्किंगची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे वॅबसाइट हा सेंटर्ड क्लबमधील सदस्य उद्योजकांचा बांधकाम क्षेत्रातील विभाग आहे. त्यामध्ये व्हेंडर्स, आर्किटेक्ट, बिल्डर्स, इंटेरियर डिझायनर्स आदी क्षेत्रात काम करणाऱ्यांचा समावेश आहे. या पॉवर ग्रुपने गेल्या तीन महिन्यांत एकत्रितपणे ११५० कोटीहून अधिक व्यवसाय केला आहे. यादरम्यान २५ एलिट मेंबर अर्थात ज्यांचा व्यवसाय १० कोटी आणि जास्त असतो, अशा व्यावसायिकांना भेटण्याची संधी मिळणार आहे. या कार्यक्रमातून कनेक्ट, व्यवसायाच्या नवीन संधी आणि मार्गदर्शन मिळणार आहे. व्यवसाय वाढीसाठी ते अतिशय उपयुक्त आहे.
मेळाव्याच्या दुसऱ्या दिवशी दुपारी ३ वाजल्यापासून जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट आणि असीमित सर्व्हिसेस (पुणे), रत्नागिरी जिल्हा हॉटेल असोसिएशन, श्री दर्यासागर पर्यटन व सेवा सहकारी संस्था (गणपतीपुळे), निसर्गयात्री संस्था, कोकण पर्यटन सहकारी संस्था (देवरूख), रत्नागिरी पर्यटन संस्था, यांच्या संयुक्त विद्यमाने लोकल टू ग्लोबल जबाबदार पर्यटनच्या व्यवसायिक संधी या पर्यटन परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमात संपूर्ण कोकणातील हॉटेल आणि पर्यटन क्षेत्रात काम करणारे उद्योजक सहभागी होणार आहेत.
पत्रकार परिषदेला क्लबचे डेप्युटी सेक्रेटरी जनरल केदार साखरे, वॅबसाइटचे सेल हेड गिरीश घुगरे, कोकण रिजन हेड राम कोळवणकर, डेप्युटी रिजन हेड तुषार आग्रे, रत्नागिरी चॅप्टरचे चेअरपर्सन राजेश शेट्ये आणि चिपळूण, कुडाळ, दापोली चॅप्टर्सचे कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.
मेळाव्याला रत्नागिरीकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उन्नतीच्या नवीन वाटा उपलब्ध करणाऱ्या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सॅटर्डे क्लबचे रिजन हेड राम कोळवणकर यांनी केले आहे. मेळाव्याच्या निमित्ताने भरणार असलेल्या प्रदर्शनातील स्टॉल घेण्याकरिता तुषार आग्रे (८००७०८८९७२), राजेश शेट्ये (९८६०६८४५६७), संजना शेट्ये (९९२३१७५२५६) किंवा अमोल पाटणे (९८६०४८६९१४) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.